शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२

चीनी ॲपवरील बंदीची कारवाई पुरेशी आहे?

सीमेवर चीनशी तणाव वाढत असल्याने ॲपबंदी केली तरीही याच काळात चिनी साहित्याची वाढलेली आयात आणि चीनवरील अवलंबित्व चिंताजनक आहे. त्यावर ‘कृतीशील आत्मनिर्भरता’ हेच उत्तर ठरू शकते. 


बि जिंगमध्ये होत असलेल्या आॅलिम्पिक स्पर्धेतील सहभागी खेळाडूंसाठी बंधनकारक असलेल्या माय २०२० अॅपच्या सुरक्षिततेवरून आणि त्यातून जमा होणाऱ्या व्यक्तिगत तपशीलांचा संभाव्य गैरवापरावरून अमेरिका, युरोपातील देशांकडून जाहीरपणे चिंता बोलून दाखविली जात आहे. तसेही चीनी अॅपबद्दल नेहमीच म्हटले जाते, की तुम्ही चीनी अॅपचा वापर करत असाल आणि तुम्ही चीनमध्ये राहत नसला तरीही तुमची सर्व माहिती चीनमध्ये जमा होत असते. याचे कारण म्हणजे चीनी सरकारचे माहिती तंत्रज्ञानावर, त्यातून जमा होणाऱ्या माहितीवर असलेले नियंत्रण. हेरगिरीसाठी, पाळत ठेवण्यासाठी साॅफ्टवेअर आणि हार्डवेअर उत्पादनांचा वापर करण्यावरून चीनबाबत जगभरात नेहमीच संशयाचे वातावरण राहिले आहे. भारतात मागील आठवड्यात ५४ चीनी मोबाईल अॅप्सवर सरकारने घातलेल्या बंदीमागेही हेच कारण राहिले आहे. वापरकर्त्यांशी संबंधित महत्त्वाची, संवेदनशील माहिती चीनी अॅप्स चीनमधील सर्व्हवर पाठवत असल्याने डेटा गोपनियता आणि देशाच्या सुरक्षेला असलेला धोका या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली. बंदी घातेल्या अॅपपैकी काही अॅप मोबाईल कॅमेरा, स्थान या माध्यमातून पाळत ठेवत असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ताज्या बंदीनंतर सरकारने प्रतिबंध घातलेल्या अॅपची संख्या जवळपास ३०० हून अधिक झाली आहे. मात्रलडाख सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनला चाप लावण्यासाठी एवढीच कारवाई पुरेशी आहे काय, हा खरा प्रश्न आहे.

दोन वर्षांपूर्वीची चीनी सैन्याची पॅंगाॅंग त्सो सरोवराच्या परिसरातील घुसखोरी, गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैनिकांमधील हिंसक झटापट आणि त्यानंतर ताबारेषेवर टोकाला पोहोचलेला तणाव अजूनही तसाच, किंबहुना अधिक चिंता वाढविणारा आहे. सीमेवर सैन्य माघारीबाबत चीनने सरळसरळ आडमुठेपणा चालवला आहे. एवढेच नव्हे तर बिजिंग हिवाळी आॅलिम्पिक स्पर्धेची मशाल नेण्यासाठी गालवान खोऱ्यात तैनात राहिलेल्या चीनी कमांडरची निवड करून चीनने भारताला जाणीवपूर्वक डिवचले. यानंतर स्पर्धेवर राजनैतिक बहिष्कार घालून भारताने आपली भूमिका स्पष्ट केली होती. पाठोपाठ, क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी, ताबारेषेवरील शांततेसाठीच्या द्विपक्षीय कराराचे चीनने एकतर्फी उल्लंघन केले, असा आरोप केला. बडे देश लिखित कराराचे उल्लंघन करत असतील तर ती आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चिंतेची बाब असेल, असेही त्यांनी फटकारले. त्यानंतर आता, या अॅप बंदीच्या कारवाईतून भारताने "सीमेवर तणाव असताना इतर क्षेत्रांमधील संबंध सुरळीत राहणार नाही”, हा इशारा दिला आहे. यामुळे चीनने काहीसा मवाळ सूर लावताना भारताला, चीनी कंपन्यांवर भेदभावाची कारवाई टाळण्याचे आणि द्विपक्षीय आर्थिक करार पालनाचे आवाहन केले आहे.

राजनैतिक, सामरिक आणि मुत्सद्देगिरीच्या भाषेतून चीनला उत्तर देण्याचा हा प्रकार म्हटला तरी प्रत्यक्षात भारतातील चीनच्या आर्थिक हितसंबंधांना दणका देण्यात सरकारला अद्याप काहीही यश आलेले नाही. मागील वर्षी ज्या अॅपवर बंदी घातली होती. ते अॅप नाव बदलून पुन्हा सक्रीय झाले होतेच. कदाचित, यासाठी तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करता येईल. परंतु, या देशाशी असलेल्या थेट व्यापाराचे काय? चीनशी असलेल्या व्यापाराचे प्रमाण पाहिले तर भारताला किती मोठा पल्ला गाठावा लागणार आहे त्याची कल्पना येईल. यातला मूळ मुद्दा आहे तो, चीनशी वाढत्या व्यापाराचा. टोकाचा तणाव असूनही, युद्धसदृष परिस्थिती निर्माण होऊनही आणि शत्रू क्रमांक एक मानूनही चीनकडून होणारी आपली आयात कमी झालेली नाही. उलट, तणावाच्या काळातही आयात वाढतच राहिलेली आहे.

सरकारचीच आकडेवारी पाहिली, तर चीनशी भारताची व्यापारातली तूट मागच्या वर्षात म्हणजे २०२१ मध्ये ६९.४ अब्ज डाॅलरवर पोहोचली होती. याचाच अर्थ, आपण चीनकडून आयात अधिक केली आणि निर्यात कमी झाली. २०२० मध्ये ही तूट ४५.९ अब्ज डाॅलरची होती. तर त्याआधी २०१९ मध्ये ५६.८ अब्ज डाॅलरची तूट होती. व्यापारातली तूट म्हणजे आयात आणि निर्यातीमधील तफावत. आपला चीनशी व्यापार मागील ४४ टक्क्यांनी वाढला. याचे कारण म्हणजे निर्यातीच्या तुलनेत आयातीमध्ये झालेली वाढ. संसदेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार २०१४ पासून ते मागील सहा वर्षात (म्हणजेच मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर) चीनकडून होणाऱ्या आयातीमध्ये ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१४-१५ मध्ये आयात ६०.४१ अब्ज डाॅलरची होती. ती २०२०-२१ मध्ये ६५.२१ अब्ज डाॅलरवर पोहोचली. ही आयात प्रामुख्याने टेलिकाॅम, उर्जा क्षेत्र, औषध उत्पादनासाठी लागणाऱ्या अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियंट्स या कच्च्या मालाची त्याचप्रमाणे संगणक हार्डवेअर, रसायने, इलेक्ट्राॅनिक वस्तुंची आहे. तुलनेने निर्यातही वाढली असली तरी सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, चीनी सैन्य सीमेवर उभे ठाकले असताना, पाकिस्तानला भारताविरुद्ध चिथावणी दिली जात असताना, अरुणाचल प्रदेशवर चीनकडून दावा सांगितला जात असताना या तणावाच्या काळात, चीनी आयातीवरचे आपले अवलंबित्व वाढले आहे.

भारताचा सर्वाधिक व्यापार अमेरिकेखालोखाल चीनशी आहे. चीनच्या व्यापारातील भारताचा हिस्सा अमेरिका, युरोपीय महासंघ, आसियान देशांच्या तुलनेत अल्प आहे. मात्र भारताच्या अवाढव्य बाजारपेठेचे आकर्षण चीनलाही असल्याने सीमेवर दादागिरी हा व्यापार वाढविण्यासाठीच्या चीनी रणनितीचाही एक भाग मानला जातो. ही रणनिती चीनने अन्य देशांसमवेत वापरली आहे. भौगोलिक आणि आर्थिक वस्तुस्थिती वेगळी असल्याने त्यांची सांगड न घालता व्यापार आणि आर्थिक संबंध सुरळीत ठेवा, असे पालुपद चीनने पालुपद कायम ठेवले आहे. किंबहुना, सीमावाद आणि व्यापारी संबंध वेगवेगळे राखण्यात आणि सोईस्कर पद्धतीने भारताची कोंडी करण्यात आतापर्यंतचे चीनी डावपेच यशस्वी राहिले आहेत. त्याच्या प्रत्युत्तरादाखल या अॅप बंदीच्या निर्णयाकडे पहावे लागेल.

अर्थात, विद्यमान अॅप बंदी सोबतच, शाओमी या चीनी मोबाईल उत्पादक कंपनीची करचुकवेगिरीबद्दलची चौकशी, हुवेई या चीनी तंत्रज्ञान कंपनीवर करचोरी प्रकरणात छापे घालणे यासारखी कारवाई मर्यादीत स्वरुपाच्या डिजिटल सर्जिकल स्ट्राईकसारखीच म्हणावी लागेल. कारण, या सांकेतिक उपायांऐवजी इतर आर्थिक क्षेत्रांमध्ये चीनवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी करण्याची गरज आहे. त्यासाठी व्यावहारीक आणि दीर्घकालीक उपाययोजनांची, कठोर नियमांची आणि अंमलबजावणीची, त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्वयंपूर्ण होण्याची, गुंतवणूक आकर्षित करण्याची आवश्यकता आहे.

अजुनही भारतातील पुरवठा साखळीत, लघु-मध्यम उद्योगांच्या स्थितीमध्ये सुधारणा झालेली नाही. चीनकडून अनावश्यक आयात कमी करण्यासाठी तसेच आत्मनिर्भरतेसाठी वेगवेगळ्या मंत्रालयाकडून सरकारने अभिप्राय मागविले असल्याचे सांगितले जात आहे. आत्मनिर्भरतेसाठी ज्या महापुरुषांच्या आदर्शांचे दाखले राज्यकर्त्यांकडून दिले जातात, त्या महापुरुषांचे भव्य पुतळे देखील चीनमधून बनवून घेण्याची वेळ येत असेल तर चीनला आर्थिक धक्का देण्यासाठी आपली क्षमता "अमृत कालामध्ये" किती वाढवावी लागेल, याचाही व्यवहार्य पातळीवर विचार करावा लागणार आहे.

(पूर्व प्रसिद्धी - दै. सकाळ, २१ फेब्रुवारी २०२२)

धूर्तपणाची खेळी!

मोदी प्रभावी वक्ते आहेत, तेवढेच धूर्त राजकारणीही. राजकीयदृष्ट्या सोयीस्कर बोलावे हे त्यांना उत्तम कळते. राजकीय विधाने करताना ‘हिट अँड रन’ शैलीचा वापर त्यांनी केला. त्यांनी काँग्रेसला प्रामुख्याने लक्ष्य केले, त्यामागे त्यांचे राजकीय डावपेच होते.


पं तप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या शैलीमध्ये संसदेत राष्ट्रपती अभिभाषणाच्या चर्चेच्या निमित्ताने आणि वृत्तसंस्थेतील प्रदीर्घ मुलाखतीच्या निमित्ताने काॅंग्रेसला, पंडित नेहरुंपासून ते राहुल गांधींपर्यंतच्या काॅंग्रेस नेतृत्वाला विलक्षण कडवट शब्दात लक्ष्य केले. आता मोदी काय बोलले याची चर्चा, विश्लेषण सुरू आहे. पण, "काय बोलले" या ऐवजी "का बोलले" याचा बारकाईने विचार केला तर हा धूर्तपणाचा राजकीय डाव असल्याचे दिसते.

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभांची निवडणुकीची धामधूम सुरू असताना त्यातही पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये मतदान होणार असताना नेमके त्याआधी जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलन, कृषी कायदे, लखिमपूर खिरी प्रकरण यासारख्या मुद्द्यांना थोडाथोडा स्पर्श करून (प्रत्यक्षात बरेचसे संदिग्धपणे बोलून) या पट्ट्यामध्ये भाजपची संभाव्य राजकीय हानी कमी करण्याचा प्रयत्न केला. याच पश्चिम उत्तर प्रदेशच्या पट्ट्यात शेतकरी आंदोलनाने भाजपला आणि पंतप्रधान मोदींना बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडले होते. त्यामुळे मोदींचा हा डॅमेज कंट्रोलचा हा एक भाग होता. गोवा, पंजाब, उत्तराखंड या राज्यांच्या मतदारांनाही सूचक भावनिक आवाहनही झाले. परंतु, यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा दिसतो तो २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठे आव्हान उभे राहण्याआधी मोडून काढण्याचा. कारण, आतापासून सुरू झालेला निवडणुकीचा हंगाम थेट लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत हंगाम चालणार आहे.

सध्या विधानसभा निवडणूक असलेल्या उत्तर प्रदेशवगळता उर्वरित चारही राज्यांमध्ये भाजपची लढाई काॅंग्रेसशी आहेमोदी-शहा जोडीचे गृहराज्य असलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेची मुदत डिसेंबरमध्ये संपते आहे. २०२३ च्या फेब्रुवारीत सुरवातीला ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालॅन्ड, मेघालय या तीन राज्यांची त्यानंतर मे महिन्यात कर्नाटक विधानसभेची, नोव्हेंबरमध्ये मिझोरम, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश विधानसभेची तर डिसेंबरमध्ये राजस्थान आणि तेलंगाना विधानसभेची मुदत संपणार आहे. एवढेच नव्हे तर सर्वात प्रतिष्ठेची राष्ट्रपती पदाची निवडणूक येत्या जुलै महिन्यात होणार आहे. या सर्वच निवडणुकांमध्ये भाजप आणि काॅंग्रेसचा संघर्ष होणार आहे.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान मोदींच्या म्हणण्यानुसाार उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, गुजरात, ओडिशा (त्यात महाराष्ट्रही जोडायला हरकत नाही) अशा प्रमुख राज्यांमधून काॅंग्रेस पक्ष एक तर दीर्घकाळापासून सत्तेतून बाहेर फेकला गेला आहे किंवा या पक्षाची तेथील ताकदही खिळखिळी झाली आहे. असे असले तरी लोकसभेच्या एकूण ५४३ मतदार संघांपैकी २०९ मतदार संघांमध्ये काॅंग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर (साधारणतः दीड डझन जागांवर विजयी उमेदवार आणि काॅंग्रेसच्या उमेदवारांमधील मतांचा फरक ५० हजाराहून कमी) होते. या २०९ पैकी सर्वाधिक म्हणजे ११९ जागा जागा गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश छत्तीसगड, राजस्थान, तेलंगाना राज्यांमधल्या आहेत. जोडीला पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, मणीपूरमधील लोकसभेच्या (ज्यावर काॅंग्रेस उमेदवार पराभूत झाले होते) जागा जोडल्यास हा आकडा १३४ पर्यंत जातो. याचा दुसरा अर्थ सध्या सुरू असलेल्या आणि लोकसभा निवडणुकीआधी होणाऱ्या ११ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये एक प्रकारे लोकसभेच्या १३४ जागांवर जनमताचा कौल आजमावणी होणार आहे.

विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीचे मुद्दे वेगवेगळे असतात असे कितीही म्हटले तरी त्यातून तयार होणाऱ्या राजकीय वातावरणाचा प्रभाव दीर्घकाळ टिकणारा असतो. उत्तर प्रदेशात काॅंग्रेस नगण्य तर पंजाबमध्ये भाजप मुख्यप्रवाहा बाहेरचा पक्ष. परंतु, गोवा आणि उत्तराखंडमध्ये सत्ताधारी भाजपला प्रस्थापितविरोधी भावनेचा सामना करावा लागतोच आहे. पण, कृषी कायद्यांवरून शेतकरी आंदोलनानंतरचे तापलेले वातावरण, उत्तर प्रदेशात ओबीसी राजकारणाच्या मुद्द्याने धरलेला जोर याकडे पाहिले, तर सध्याच्या विधानसभा निवडणुकांचा प्रतिकूल निकाल भाजपविरोधी राजकारणाला बळ मिळण्याची आणि अंतिमतः या लोकसभा निवडणुकीपर्यंत या वातावरणाचा लाभार्थी काॅंग्रेस पक्ष ठरेल. याचा अंदाज मोदींसारख्या २४ तास राजकारण करणाऱ्या नेत्याने बांधला नसेल तरच नवल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभावशाली वक्ते आहेत तेवढेच धूर्त राजकारणी आहेत. नेमके काय बोलावे आणि किती बोलावे, कितपत सोईस्कर बोलावे हे त्यांना उत्तम कळते. राजकीय विधाने करताना "हिट अॅन्ड रन" (हाणा आणि पळ काढा) शैलीचा त्यांनी नेहमी वापर केला आहे आणि प्रतिमा निर्मितीत याचा त्यांना चांगला फायदाही झाला आहे. तुलनेत काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी हे विस्कळीत बोलणारे प्रभावहीन वक्ते आहेत. शिवाय, काॅंग्रेसचा प्रभावही इतका ओसरला आहे की कोणीही यावे आणि टपली मारून जावे अशी स्थिती आहे. असे असताना आतापर्यंत काॅंग्रेसला अनुल्लेखाने मारणाऱ्या पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये राष्ट्रपती अभिभाषणात काॅंग्रेसलाच लक्ष्य करण्याची किंवा एवढे महत्त्व का दिले, हा प्रश्न उपस्थित होतो. याचे उत्तर म्हणजे, कधी नव्हे ते राहुल गांधींचे लोकसभेतले राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेदरम्यानचे भाषण प्रभावी होते. प्रभावी या अर्थाने, की विस्कळीत आणि सर्वसामान्यांना न भावणारे बोलूनही त्यांचे भाषण राजकीय आव्हान देण्याच्या दृष्टीने परीपूर्ण, नव्या राजकीय समीकरणांसाठी जाहीरपणे लवचिकता दर्शविणारे, तडजोडीचे संकेत देणारे होते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे हिट अॅन्ड रन शैलीत मोदींची प्रतिमा भंजन करणारे होते. त्या भाषणाचे यश म्हणजे पंतप्रधान मोदींचा काॅंग्रेसवरचा हल्ला.

कितीही नाकारले किंवा हेटाळणी केली तरी भारतीय राजकारणात काॅंग्रेस हा मुख्य पक्ष आणि विरोधकांच्या संभाव्य एकजुटीचा एक खांब आहे. हा खांब उभा राहण्याचा आधीच आडवा करण्याचा प्रयत्न म्हणूनही संसदेत मोदींच्या काॅंग्रेसविरोधी हल्ल्याकडे पाहता येईल. या शाब्दीक टोलेबाजीमध्ये मोदींनी समाजवादी पक्ष, तृणमूल काॅंग्रेस, द्रमुक, शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस, बहुजन समाज पक्ष, डावे पक्ष यांचे अस्तित्व खिजगणतीतही धरले नाही. ना त्यांच्याकडून उपस्थित झालेल्या राज्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले होते. मुख्य धोका काॅंग्रेसकडून असल्याने हा पक्ष उभाच राहू नये हाच उद्देश त्यांच्या बोलण्याच्या मुळाशी होता.

दुसरे म्हणजे, मोदींची इमेज हेच भाजपचे आणि मोदींचेही भांडवल आहे त्याला सुरूंग लागला तर गोंधळ उडायला फारसा वेळ लागणार नाही हे इतरांपेक्षा मोदींना चांगले कळते. बरे, यामध्ये राहुल यांचे नेतृत्व इतर विरोधी पक्षांना गंभीर वाटो अथवा न वाटो. पण भाजप विरोधात सक्षम आधार शोधण्याच्या प्रयत्नात त्यांनी काॅंग्रेस केंद्रीत मांडणी केली तर भाजपचा चौखुर उधळलेला वारू भले रोखला जाणार नाही पण त्याच्या मार्गात अडथळे नक्कीच येतील, याची धास्ती मोदींना नक्कीच आहे. त्यामुळे १) देशविरोधी कारवायांचे आरोप करून काॅंग्रेसला एकाकी पाडणे, ) काॅंग्रेस सोबत जाऊ पाहणाऱ्या विरोधी पक्षांचा बुद्धीभेद करणे आणि संभाव्य विरोधी ऐक्य तयार होण्याआधीच त्यांच्यात फूट पाडणे, ) याच भावनिक मुद्द्याचा आधार घेत उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातली हानी मर्यादीत राखण्याचा प्रयत्न करणे आणि उर्वरित टप्प्यांच्या प्रचाराची दिशा निश्चित करणे, ) पंजाब, गोवा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये काॅंग्रेसचा मार्ग काटेरी करणे, पर्यायाने गुजरात आणि आगामी अन्य विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचाराची पूर्वपिठीका तयार करणे त्याचप्रमाणे, ) व्यक्तिगत हल्ल्यांमुळे व्यक्तिकेंद्रीत राजकारणाचीच चर्चा व्हावी आणि राजकीय, आर्थिक, सामाजिक मुद्द्यांच्या आधारे मतदारांनी सरकारच्या कामगिरीची तुलना करण्याऐवजी नेत्यांच्या प्रतिमेची तुलना करून मतदान करावे, ही शुद्ध मानसशास्त्रीय दबावाची खेळी मोदींनी खेळली आहे.

(पूर्व प्रसिद्धी, दै. सकाळ, दिनांक १४ फेब्रुवारी २०२२)



राज्य विरुद्ध राज्यपाल!

राज्यपालांचे काम घटनात्मक नियमांच्या पालनाचे आहेराज्यपाल आणि मुख्यमंत्री या घटनात्मक पदांमधील नाते शिष्टाचाराचे आहेक्षुल्लक वादातून आरोप - प्रत्यारोप करण्याचे नक्कीच नाहीया दोन्ही सर्वोच्च पदांनी संवाद साधल्यास पेचही निर्माण होणार नाहीपणराज्यसरकारला सल्ला देण्यापलिकडे जाऊन राज्यपाल प्रत्येक विषयात लक्ष घालणार असतील तर विधानसभा आणि त्यामाध्यमातून जनतेप्रती उत्तरदायीत्वाच्या आपल्या अधिकारांचे काय हा मुख्यमंत्र्यांकडून उपस्थित होणारा प्रश्नही गंभीर आहे.


लो कसभेमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पाचे भाषण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी बाकांवरील नेत्यांच्या झालेल्या छोटेखानी संवादात तृणमूल काॅंग्रेसचे नेते सौगत राॅय यांनी पश्चिम बंगालमधील राज्यपाल धनकर यांना कधी परत बोलवणार असा सवाल केला. त्यावर पंतप्रधान मोदींचे सौगत राॅय यांना उत्तर होते - तुम्ही निवृत्त झाल्यानंतर! यात नेमका रोख सौगत राय यांच्यापुरता मर्यादीत होता की तृणमूल काॅंग्रेसच्या सरकारच्या दिशेने होता, याचा अन्वयार्थ प्रत्येकजण आपापल्यापरीने काढण्यासाठी मोकळा आहे. भाजपेतील पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये राज्यपालांच्या वर्तनावरून कसे वादंग पेटले आहे आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांची त्यावरची भूमिका कशी आहे त्याचे हे छोटेसे उदाहरण. आणखी एक उदाहरण म्हणजे, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण झाल्यानंतर संसदेच्या मध्यवर्ती कक्षातून ते बाहेर पडत असताना तृणमूल काॅंग्रेसचे नेते सुदीप बंधोपाध्याय यांनी अभिभाषणानंतर राष्ट्रपतींसमोरच राज्यपालांना परत बोलवा अशी मागणी केली होती.

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल धनकर यांच्यातील ट्विटर वादानंतर चिघळलेले वातावरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातला हा संघर्ष आता संसदेत पोहोचला आहे. यात पश्चिम बंगाल हे एकटेच राज्य नाही. तर नीट परिक्षेतून तामिळनाडूला वगळण्यासाठी विधानसभेत मंजूर झालेले विधेयक राज्यपालांनी नाकारल्यानंतर थयथयाट करणाऱ्या सत्ताधारी द्रमुकची, महाराष्ट्रात विधान परिषदेत राज्यपालनियुक्त आमदारांच्या निवडीसाठी राज्य मंत्रीमंडळाची शिफारस निकाली न निघाल्याने संतप्त सत्ताधारी शिवसेनेचीही त्याला जोड मिळाली आहे. यातला मूळ मुद्दा आहे तो राज्यांच्या अधिकारांचा आणि त्यामध्ये राज्यपालांकडून आणल्या जाणाऱ्या अडथळ्यांचा.

याआधीही यावर सातत्याने चर्चा झाली आहे, आरोप प्रत्यारोप झाले आहेत. पुन्हा हा विषय समोर येण्याचे कारण म्हणजे संसद अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या निमित्ताने विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला केलेले लक्ष्य. शिवसेना (महाराष्ट्र) द्रमुक (तामिळनाडू), डावी आघाडी (केरळ), काॅंग्रेस (राजस्थान, पंजाब आणि झारखंड) हे राज्यांमधील सत्ताधारी पक्ष राज्यपालांमुळे दुखावलेले आहेतच, शिवाय केंद्रातल्या सत्ताधारी भाजपसाठी वेळप्रसंगी संसदेत सहकार्याची भूमिका घेणाऱ्या बिजू जनता दल (ओडिशा), वायएसआर काॅंग्रेस (आंध्रप्रदेश), तेलंगाणा राष्ट्र समिती (तेलंगाणा) या पक्षांची अस्वस्थता देखील बोलकी आहे.

लोकसभेमध्ये राष्ट्रपती अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान काॅंग्रेस नेते राहुल गांधींनी भाषेच्या संवेदनशील मुद्द्यावर तामिळनाडूची बाजू घेत सत्ताधारी द्रमुकच्या भावनांना घातलेला हात, नीट परिक्षेच्या निमित्ताने द्रमुकने राज्यपालांविषयी उघड केलेली नाराजी, महाराष्ट्रात राज्यपालांच्या माध्यमातून राज्य सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा आरोप, राष्ट्रपतींच्या अभिभाषणात एकदाही संघराज्य व्यवस्थेचा (कोआॅपरेटिव्ह फेडरेलिजम)चा उल्लेख झाला नाही हा बिजू जनता दलाचे सस्मित पात्रा यांचा राज्यसभेतील चर्चेदरम्यानचा दावा ही सारी उदाहरणे राज्यांची नेमकी भावना दर्शविणारी आहेत. तर, राज्यपाल घटनात्मक पद असल्याने त्यांच्याबाबत संसदेत चर्चा करणे नियमबाह्य असल्याचे सत्ताधारी भाजपकडून देण्यात आलेले दाखले म्हणजे या वादाकडे होता होईल तो दुर्लक्ष करण्याच्या भूमिकेचे निदर्शक आहेत.

राज्य आणि राज्यपाल या वादामध्ये स्थानिक सत्ताधाऱ्यांचे राजकारण असेलही पण राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचमधील  संघर्षाच्या निमित्ताने केंद्र – राज्य संबंधात पेच वाढल्याची चर्चा आजच्या इतकी यापूर्वी झाली नव्हती. राज्यपालांचे काम घटनात्मक नियमांच्या पालनाचे आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री या घटनात्मक पदांमधील नाते शिष्टाचाराचे आहे. क्षुल्लक वादातून आरोप - प्रत्यारोप करण्याचे नक्कीच नाही. या दोन्ही सर्वोच्च पदांनी संवाद साधल्यास पेचही निर्माण होणार नाही. पण, राज्यसरकारला सल्ला देण्यापलिकडे जाऊन राज्यपाल प्रत्येक विषयात लक्ष घालणार असतील तर विधानसभा आणि त्यामाध्यमातून जनतेप्रती उत्तरदायीत्वाच्या आपल्या अधिकारांचे काय हा मुख्यमंत्र्यांकडून उपस्थित होणारा प्रश्नही गंभीर आहे.

राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील संबंध ताणलेले राहिल्याचीच उदाहरणे अधिक आहेत. ईशान्य भारतातील राज्ये, जम्मू काश्मीर सारखे संवेदनशील राज्य (आताचा केंद्रशासीत प्रदेश) या ठिकाणी लष्करातले किंवा गुप्तहेर खात्याचे निवृत्त अधिकारी राज्यपालपदी नेमण्याची प्रथा राहिली आहे. त्यांनी या राज्यांमध्ये केंद्र सरकारचे डोळे आणि कान बनून राहावे ही त्यांच्याकडन अपेक्षा असते. पण उर्वरित राज्यांमध्ये राज्यपाल पदावरील नियुक्त्यांना राजकीय सोय - गैरसोय पाहण्याची, पारितोषिक किंवा सक्रीय राजकारणातून अलगद बाजूला सरकवण्याची शिक्षा यासारख्या, हेतूंची झालर सातत्याने राहिली आहे.

केंद्रात सत्तेवर येणार्‍या सर्वच पक्षांनी नेहमीच पक्षपाती भूमिका बजावणाऱ्या राज्यपालांची नियुक्ती केली आहे. मात्र, केंद्रात प्रचंड बहुमताच्या एका पक्षाची सत्ता असताना, राज्यपालांच्या उपद्रवाचा मुद्दा वारंवार एकापेक्षा अधिक राज्यांकडून वारंवार मांडला जाणे ही बाब संघ राज्य व्यवस्थेमध्ये चिंताजनक आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, महाराष्ट्राची उदाहरणे अलीकडची असली तरी केरळमध्ये राज्यसरकार आणि राज्यपालांमध्ये झाेला वाद, दिल्ली आणि पाॅंडिचेरी या विधानसभा असलेल्या केंद्रशासीत प्रदेशांमध्ये नायब राज्यपालांच्या हस्तक्षेपावरून झालेले आरोप प्रत्यारोपही फारसे जुने नाहीत. राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध काॅंग्रेस नेते सचिन पायलट यांच्या राजकीय बंडाळीदरम्यान विश्वासदर्शक ठऱावावरून राज्यपालांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित झाले होते. एकूणच मोदी सरकारच्या कार्यकाळात केंद्र आणि राज्यांचे ताणले गेलेले संबंध हा वादाचा मुद्दा बनला आहे.

यासारख्या मुद्द्यांवरून नवी राजकीय समीकरणे तयार करता येतील काय याची चाचपणीही झाली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सामाजिक न्यायाच्या नावाखाली काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासह ३६ नेत्यांना पत्राद्वारे केलेले आवाहन, हे त्याचेच उदाहरण म्हणता येईल. भाजप आणि काॅंग्रेस विरोधात प्रादेशिक पक्षांची वेगळी आघाडी बनविण्याची आणि किंगमेकर बनण्याची इच्छा बाळगून असलेल्या तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताज्या हैदराबाद दौऱ्यामध्ये स्वागत शिष्टाचाराकडे पाठ फिरवून भविष्यातील वाटचालीचे संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी तर आधीच विरोधकांच्या नेतृत्वाच्या लढाईत उडी घेतली आहे. आपणच विरोध पक्षांच्या ऐक्याच्या केंद्रस्थानी आहोत हा काॅंग्रेसचा दावा सर्वविदीत आहे. या सर्व प्रयत्नांना बळ मिळण्यासाठी आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाची. तेथील निकालांवर समाजवादी पक्षाच्या यशापयशावर देखील या भावी समीकरणांचे भवितव्य अवलंबून असेल. परंतु काहीही झाले तरी घटनात्मक पदांवर विराजमान असलेल्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली नाही तर राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हे वाद सुरूच राहतील.

(दि. ७ फेब्रुवारी २०२२)



मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

हिंदुत्व की सामाजिक न्याय?

सध्या राष्ट्रीय उत्सुकतेचा विषय बनलेली आणि देशाच्या राजकारणाला नवे वळण देऊ पाहणारी उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूकया निवडणुकीत हिंदुत्वाचे राजकारण जेवढे चर्चेत आहेत्याला छेद द्यायला ओबीसी-मागासवर्गाचे सामाजिक न्यायाचे राजकारण पुढे सरसावल्याने लढाईत अपेक्षेपेक्षा अधिक रंग भरला आहे.

(पूर्व प्रसिद्धी - साप्ताहिक सकाळ दि. ३१ जानेवारी २०२२)




उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी एका अल्पसंख्यांक नेत्याशी गप्पा सुरू होत्या. अर्थातच, विषय युपीचा, भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाचा आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचा होता. घोर भाजपविरोधी, आक्रमक आणि वादग्रस्त बोलून प्रकाशझोतात राहणे ही या नेत्याची ओळख. त्याच्या म्हणण्यानुसार गर्दी आणि मिळणारी मते यांचे प्रमाण नेहमी व्यस्त स्वरुपाचे असते. त्यातही धार्मिक ध्रुवीकरणाची छुपी धार त्याला मिळाली असेल तर हे व्यस्त प्रमाण आणखी तीव्र होते. थोडक्यात, या नेत्याचा इशारा होता तो हिंदुत्वाच्या नावाखाली होणाऱ्या प्रचाराकडे. युपीच्या जातीय उतरंडीच्या राजकारणात भाजपने किंबहुना संघ परिवाराने ज्याला हिंदू मतपेढीमध्ये बांधण्याचा प्रयत्न केला आले, असा मतदार सहजासहजी या ध्रुवीकरणापासून अलिप्त होईल अशी नजीकच्या काळात तरी शक्यता नाही असे या नेत्याचे म्हणणे होते.

हा दाखला देण्याचे कारण म्हणजे सध्या राष्ट्रीय उत्सुकतेचा विषय बनलेली आणि देशाच्या राजकारणाला नवे वळण देऊ पाहणारी उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक. या निवडणुकीत हिंदुत्वाचे राजकारण जेवढे चर्चेत होते, त्याला छेद द्यायला ओबीसी-मागासवर्गाचे राजकारण पुढे सरसावल्याने लढाईत अपेक्षेपेक्षा अधिक रंग भरला आहे. कधीकाळी तिरंगी, चौरंगी लढतींभोवती फिरणारी युपीची निवडणूक, गलितगात्र बहुजन समाज पक्ष आणि खिजगणतीत नसलेल्या काॅंग्रेसमुळे, आता सरळसरळ भाजप (हिंदुत्व= कमंडल) विरुद्ध समाजवादी पक्ष (ओबीसी-मागासवर्ग = कमंडल) अशी द्विध्रुवीय झाली आहे. अनुकूल निकाल लागल्यास २०२४ मध्ये सत्तावापसीसाठी भाजपच्या पथ्यावर पडणारा असेल. तर, प्रतिकूल निकाल विरोधी पक्षांच्या भाजप विरोधी राजकारणारा बळ देणारा ठरेल. मात्र, त्यात सध्याचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काॅंग्रेसची बार्गेनिंग पाॅवर कमी करणाराही ठरेल, ज्याची जाणीव पश्चिम बंगालच्या निकालानंतर तृणमल काॅंग्रेसकडून काॅंग्रेसला सातत्याने करुन दिली जाते. विशेष म्हणजे, निवडणुकीला तोंड फुटण्याआधीच काॅंग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी, निवडणुकीनंतर इतर पक्षांना पाठिंब्यासाठी काॅंग्रेस विचार करेल, असे सांगून आधीच लढाईतून माघार अधोरेखित केली आहे.

कट्टर, आक्रमक हिंदुत्वाच्या आधारे धार्मिक भावनेला हात घालून मतपेढी बांधण्याचा भाजपचा प्रयत्न २०१४ मध्ये आणि २०१९ मध्ये (युपीत २०१७ मध्ये) यशस्वी ठरला. परंतु, सामाजिक न्यायाचा मुद्दा जसा पुढे येतो आणि मागासवर्गीय समुह आपली राजकीय शक्ती, ओळख ठसविण्याचा प्रयत्न करतात तेव्हा धार्मिक ओळख आपसूक मागे पडते आणि धर्मकेंद्रीत राजकारण देखील. अशाच प्रकारच्या सामाजिक ध्रुवीकरणाने भाजपला बिहारमध्ये पराभवाचे तोंड पहावे लागले होते. आता, उत्तर प्रदेशात उग्र हिंदुत्वाचे प्रतिक बनू पाहणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळातून यादवेतर परंतु ओबीसी समुदायांचे प्रतिनिधित्व करणारे तीन मंत्री आणि नऊ आमदारांचे समाजवादी पक्षात, म्हणजेच ओबीसींमधील यादव या मोठ्या जातीच्या नेतृत्वाखाली, झालेले पलायन हेच दर्शविणारे आहे.

युपीला हिंदुत्वाची नवी प्रयोगशाळा बनविण्याचा जो प्रयत्न झाला आहे, त्याआधी या राज्याला मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर बदलेल्या राजकीय समीकरणांचाही इतिहास राहिला आहे. हिंदुत्वाच्या राजकारणातून मंडल राजकारणाचे काटे उलट दिशेने फिरविण्याचा जो प्रकार होता त्याविरोधातील ही एक खदखदही म्हणता येईल. परंतु, ओबीसी नेत्यांच्या पलायनामुळे हिंदू मतपेढी बांधण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना सुरुंग लागला हे उघड आहे. निवडणुकीच्या आधी प्रतिस्पर्धी पक्षाला गळती लागल्याचे चित्र निर्माण करण्यात आणि त्यातून मतदारांना गोंधळून टाकण्याच्या खेळात ज्या भाजपचा हातखंडा राहिला आहे, त्या खेळात समाजवादी पक्षाने भाजपला धोबीपछाड दिली आहे. अमित शाह यांच्यासारखे चाणक्यही यामुळे सध्या तरी मौनात गेल्याचे दिसते आहे.

आतापर्यंत भाजपने या खेळाचे यशस्वी प्रयोग महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यांमध्ये केले होते. परंतु, भविष्याच्या राजकारणाची पायाभरणी करण्यासाठी मोदी-शाह जोडगोळीची ज्या राज्यावर सर्वाधिक मदार आहे, त्या युपीमध्येच नेते पळवापळवीचा डाव भाजपवर उलटला. जोडीला, यादव-मुस्लिम हे हक्काचे एमवाय समीकरण जपताना राजभर, मौर्य, कुशवाहा, कोयरी, सैनी, मल्लाह या मागास जातींना जोडणारे, पश्चिम उत्तर प्रदेशात जाट या प्रभावशाली समुदायाला सोबत घेण्यासाठी राष्ट्रीय लोकदलाशी आघाडी करण्याची अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने दाखविलेली चतुराई या निवडणुकीचे रागरंग बदलणारी ठरली आहे. तसेच बहुजन समाज पक्षाच्या निष्क्रियतेमुळे दलित मतांमध्ये असलेली संभ्रमावस्था आणि ब्राह्मण – ठाकूर या सवर्ण जातींचा संघर्ष असला तरी अंतिमतः त्यांचा भाजपकडे राहणारा कल, या गोष्टीही समाजवादी पक्षाला लाभदायक ठरू शकतात. याच्या जोडीला, बेरोजगारी, पश्चिम उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादकांचे प्रश्न, नोकरभरतीमुळे तरुण वर्गात असलेली अस्वस्थता, कोविड महामारीमुळे झालेली वाताहात, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमधील नाराजी हे ज्वलंत मुद्दे हाताशी आहेत. पण..... !

युपी सारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील राज्यात हा "पण" महत्त्वाचा ठऱतो. कारण, हे आकड्यांचे गणित अजूनही भाजपसाठी तेवढे प्रतिकूल झालेले सध्या तरी दिसत नाही. ज्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या जोरावर भाजपने २०१७ च्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीत २५ टक्क्यांची मुसंडी मारत ४० टक्के मते घेतली होती. आणि हक्काच्या मतांमध्ये सात टक्क्यांच्या घसरणीनंतर २२ टक्क्यांपर्यंत समाजवादी पक्षाची मतांची टक्केवारी खाली आली होती. ही १८ टक्क्यांची दरी बुजवण्याची मोठी कामगिरी या प्रादेशिक पक्षाला पार पाडावी लागणार आहे. काही अंशी ही तफावत कमी झालीही आहे. मात्र, मतदारांच्या कल चाचपणीतून अंदाज वर्तविणाऱ्या सी वोटर्स या अध्ययन संस्थेचे संपादक खालिद अख्तर यांच्या म्हणण्यानुसार, शेतकरी आंदोलन यशस्वी ठरल्यानंतर पश्चिम उत्तर प्रदेशात शेतकरी संघटनांनी भाजप विरोधी जाहीर भूमिका घेऊनही, तसेच ओबीसी मंत्री, आमदारांच्या पलयानानंतरही भाजप आणि समाजवादी पक्षाला मिळणाऱ्या संभाव्य मतांमध्ये नऊ टक्क्याचे अंतर आहे. म्हणजे, अजूनही युपीतला संघर्ष समाजवादी पक्षाच्या म्हणण्यानुसार १५-८५ (सवर्ण विरुद्ध मागासवर्गीय) असा असला तरीही, मतदारांमध्ये तो दिसणारा नाही.

एबीपी या वृत्तवाहिनीसाठी सी वोटर्सतर्फे मतदारांचे सर्वेक्षण केले जात आहे. यातील ताज्या निष्कर्षांनुसार मागील सात ते आठ आठवड्यांपासून भाजपच्या मतांची टक्केवारी ४० ते ४२ टक्क्यांदरम्यान तर समाजवादी पक्षाच्या मतांची टक्केवारी ३१ ते ३३ टक्क्यांदरम्यान आहे. या द्विध्रुवीय लढाईमध्ये मतांमधील ९ टक्क्यांचे अंतर मोठे असून भाजप आणि समाजवादी पक्षाच्या अन्य पक्षांसमवेत झालेल्या आघाड्यांनतरही या टक्केवारीमध्ये फारसा बदल होताना दिसत नाही. २०१७ च्या तुलनेत समाजवादी पक्षाला फायदा होतो आहे. तर भाजपच्या मतांमध्ये अवध आणि पूर्वांचल भागात वाढ झाल्याचे आढळले आहे. मात्र पश्चिम उत्तर प्रदेश आणि बुंदेलखंड भागात हा पक्ष पिछाडीवर असल्याकडेही खालिद अख्तर लक्ष वेधतात. याचाच अर्थ, सध्या तरी उत्तर प्रदेशातले वातावरण भाजपच्या ८० टक्के विरुद्ध २० टक्के या राजकीय प्रचाराला अनुकूल आहे. परंतु, ध्रुवीकरणाच्या जोरावर २०१७ मध्ये ज्या पश्चिम उत्तर प्रदेशातील १४ जिल्ह्यांमधल्या ७१ पैकी ५१ जागा भाजपने सहजपणे खिशात घातल्या होत्या. त्या पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपला नाराजीचा फटका बसू शकतो. या भागातील निवडणूक पहिल्याच टप्प्यात आहे.

एकंदरीत, समाजवादी पक्षाला मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. या पक्षासमोर आणखी एक अडथळा आहे तो कोविड महामारीमुळे प्रचारावर आलेल्या निर्बंधांचा. या निर्बंधांमुळे, डिजिटल प्रचारातील सक्षमता हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण तंत्रज्ञानाचा वापर करून प्रचार करण्यात भाजपने नेहमीच आघाडी साधली आहे. तंत्रज्ञान वापराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदीचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल. कारण, योगी आदित्यनाथ यांचे नाव कितीही चर्चेत आणले तरी अंतिमतः भाजप मोदी हा ब्रॅन्ड घेऊनच लढाईत उतरणार आहे. हे नमूद करण्याचा हेतू म्हणजे, अजूनही एक मोठा वर्गाचा समज, युपीची निवडणूक योगी केंद्रीत असल्याच्या आहे. प्रत्यक्षात भाजपच्या भाषेतील डबल इंजिनापैकी योगींचे इंजिन मागे आहे, पुढचे इंजिन नरेंद्र मोदी हेच आहे. उत्तर प्रदेशात हिंदुत्वाचे, सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या व्यापक मांडणीचे व्यापक जे प्रयत्न वेगवेगळ्या पातळ्यांवरून झाले आहेत त्यांची तार्किक परिणती साधल्याशिवाय हे राज्य हातातून सोडण्याइतका भाजप (हवे तर संघ परिवार म्हणा) नक्कीच दुधखुळा नाही.

पंतप्रधान मोदींच्या आतापर्यंतच्या प्रत्येक कृतीतून, वक्तव्यातून, युपीकेंद्रीत हिंदुत्वाच्या मतपेढीला (तोही ओबीसींच्या मागासवर्गीयांचा राजकारणाला पुसटसा स्पर्श करत) साद घालण्याचा संदेशही लपून राहिलेला नाही. मग तो स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पाद प्रक्षालनाचा प्रकार असो, किंवा मागील वर्षी जुलैमध्ये झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळातील फेरबदलानंतर २७ ओबीसी आणि २० अनुसूचित जाती जमातीच्या मंत्र्यांचे मंत्रीमंडळ सांगण्याचा प्रकार असो. या व्यतिरिक्त राम मंदिर, काशी विश्वनाथ धाम काॅरिडाॅर, केदारनाथ धाम येथे आदी शंकराचार्यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना यासारख्या यासारख्या कार्यक्रमांमधून हिंदुत्वाचा सूचक प्रचार पंतप्रधान मोदींकडन सातत्याने सुरू आहेच. अयोध्या , काशी यासारख्या धर्मस्थळांच्या निमित्ताने हिंदू धर्मियांना, निषादराज, शबरीदेवी, लखनौतील मोरी माई या धार्मिक देवतांच्या उल्लेखाच्या निमित्ताने मागासवर्गीयांना हिंदुत्वाच्या अजेंड्याशी जोडण्याचा भाजपचा प्रयत्न लपून राहिलेला नाही. अलिकडेच वाराणसीमधील भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी मुस्लिम आक्रमकांविरुद्ध शिवाजी महाराज उभे ठाकल्याचा दिलेला दाखला, राजा सुहेलदेव, गोकुळ जाट या इतिहास पुरुषांच्या प्रतिकांच्या निमित्ताने प्रभावशाली ओबीसींना हिंदुत्वाशी जोडण्याचा केलेला प्रयत्न, ही त्याची काही उदाहरणे म्हणता येतील. या हिंदुत्वामुळे, धर्मनिरपेक्ष म्हणविणाऱ्या पक्षांनी घेतलेला धसका, मुस्लिम समुदायाला राजकीय पटलावरून बाद करणारा ठरला आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या प्रचारसाहित्यामध्ये दाढीधारी, टोपीधारी व्यक्ती गायब झाल्याचे दिसतात. या हिंदुत्वाच्या राजकारणाला उत्तर प्रदेशात मंडल राजकारण आव्हान दिले आहे, ते कितपत यशस्वी ठरते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.