शुक्रवार, ३ डिसेंबर, २०१०

अहिंसावादी गांधीजींचे "हत्यार'....!






गांधीजींचे फाटके व्यक्तीमत्व समोरच्यावर प्रभाव कसे टाकायचे आणि त्याला आपले म्हणणे कसे मान्य करायला लावायचे हा कुतुहलाचा विषय आहे. खरे तर तेच त्यांच हत्यार होतं. पहाटे उठून प्रार्थना, सूत कताई, पत्रव्यवहार हे उद्योग आणि नंतर देशाचे राजकारण तेही फक्त आपल्याच पद्धतीने चालविणे आणि इतरांना तसे करण्यास भाग पाडणे हे फक्त गांधीजीच करू जाणे. (आपले समोरच्याने ऐकावे आणि तसे वागावे, हे आपल्याला कितपत जमते याचा विचार करा, म्हणजे कळेल.)


साधेसे उदाहरण घेऊ या - इंग्लंडमध्ये पंतप्रधानांशी चर्चा करायची होती. तिकडून ब्रिटिशांचे एक से एक मुत्सद्दी. आपल्याकडून फक्त एकच.... काटकुळा म्हातारा ... मोहनदास करमचंद गांधी..... भन्नाट डोकं. विचारांची आणि मुद्‌द्‌यांची तर्कशुद्ध मांडणी. टोकाच्या डिप्लोमॅटीक पद्धतीमध्ये तर बाप माणूस. नरमायला लावले ब्रिटिशांना.

"अहिंसेसाठी मरा' असे एक माणूस सांगतो आणि प्रचंड मोठा जनसमुदाय ते ऐकून चक्क मरायला तयार होतो, ही कल्पना चर्चिल सारख्यांना भोळसट किंवा तद्दन मुर्खपणाची वाटत असली तरी पारतंत्र्यात ते भारतीय जनतेसाठी ते पुण्यकर्म होते. अन्‌ हीच बाब धूर्त ब्रिटीशांना धडकी भरविण्यासाठी पुरेशी होती. कारण, आज "मरा' म्हणणाऱ्या या प्रभावशाली व्यक्तीचा मनपरिवर्तनावरील विश्‍वास उडाला आणि चुकून त्याच्या तोंडून "मरा'ऐवजी "मारा' असे निघाले तर एकही इंग्रज शिल्लक राहणार नाही, याची त्यांना जाणीवर होती. 1857 मध्ये संतप्त भारतीयांच्या रुद्रावताचा अनुभव घेतलेले ब्रिटीश म्हणूनच गांधीजींच्या शब्दाला मानत होते. व्यापारी अन्‌ व्यवहारी वृत्तीच्या इंग्रजांच्या या कृतीमागे अपरिहार्य अगतिकतेचा छुपा व्यवहारही होता.

यात मुळ मुद्दा तो गांधीजींचा प्रभावाचा. प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद याच्या सारख्या खमक्‍या राजकारण्यावर पडलेल्या त्यांच्या प्रभावाचे वर्णन डॉ. राजेंद्र प्रसादांच्या आत्मचरित्रात आले आहे. चंपारण्यातील (बिहार) नीळ उत्पादन, त्यात गोऱ्यांच्या अत्याचारात भरडल्या गेलेल्या भारतीय शेतकऱ्यांसाठीची लढाई आणि त्यातील गांधींजीचा सहभाग बाबू राजेंद्र प्रसादांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य लढ्यात घेऊन आला.

गांधी भेटीबद्दल डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणतात ः प्रथमदर्शनी गांधीजींचा माझ्यावर विशेष असा प्रभाव पडला नाही. चंपारण्यची परिस्थिती मला थोडीबहुत माहित होती. परंतु, मुख्यतः बाबू व्रजकिशोर यांची आज्ञा म्हणूनच मी सुरवातीला तिथे गेलो होतो. वाटले, जेवढे काम होईल तेवढे करून टाकावे. पण तिथे गेल्याबरोबर तुरुंगात जाण्याचा बिकट प्रश्‍न समोर उभा राहील असे स्वप्नातही वाटले नव्हते.

गांधीजींनी सगळ्या गोष्टी सांगितल्या व अधिक माहिती त्यांच्याबरोबर असलेल्या बाबू धरणीधर आणि बाबू रामनौमी याना विचारा असे सांगून, स्वतः श्री. पोलक यांच्याशी बोलत बसले. आम्ही त्या दोन्ही बंधूंच्याकडून सविस्तर माहिती मिळवली. नंतर समजले, की गांधीजी रात्रभर जागून व्हॉईसरॉयव इतर नेते यांना पाठविण्यासाठी पत्रे लिहित होते, तसेच न्यायालयात देण्याचा जबाबही त्यांनी स्वतःच तयार केला. त्यांचे दुभाषी म्हणून त्यांच्याबरोबर गेललेल्या दोघांना त्यांनी विचारले कीं, ""मी तुरुंगात गेल्यावर तुम्ही काय करणार?'' त्यांना या प्रश्‍नाचे गांभीर्य उमगलें नसावे. बाबू धरमईधर थट्टेने म्हणाले- आपल्याला अटक झाल्याव दुभाष्याचे काही काम राहणार नाही. तेव्हा आम्ही आपापल्या घरी परत जाऊ'' त्यावर गांधीजी म्हणाले - ""आणि हे काम असेंच सोडून देणार?'' मग मात्र त्या लोकांना विचार करावा लागला. त्यांच्यापैकी वडील असलेले बाबू धरणीधर यांनी सांगितले - ""आम्ही पाहणी करण्याचे काम पुढे चालू ठेवूं, आणि आमच्यावरहि सरकारने हद्दपारीची नोटीस बजावली तर आम्ही तुरुंगात जाण्यास तयार नसल्याने परत जाऊ, आणि दुसऱ्या वकिलांना पाठवू मग ते पाहणीचे काम करतील. त्यांच्यावरही हुकुम बजावला गेला तर तेही परत जातील आणि त्यामागून तिसरी तुकडी येईल. अशा प्रकारे हे काम चांगले चालू राहील''.

हे ऐकून गांधीजींचे कांहीसे समाधान झालें, पण संपूर्ण समाधान झाले नाही. त्याही लोकांना स्वतःच्या उत्तराने पूर्णण समाधान मिळाले नाही. रात्रभर त्यांच्या मनांत विचार येत होते कीं, हा माणूस कुठून येऊन इथल्या रयतेचं दुःख निवारण करण्यासाठी तुरुंगात जातो आहे, आणि आपण मात्र इथले राहणारे असून अशा प्रकारे परत जावें, हें कांही योग्य दिसत नाही.

परंतु तुरुंगात जाण्याचा विचार आम्हीं अद्याप केलेला नव्हता. तुरुंग म्हणजे एखादी भयंकर जागा वाटे. कैद केल्यावरहि जामिनावर सुटण्यासाठी लोक हजारों रुपये खर्च करीत. नाईलाजाने कुणाला तुरुंगात जावेंच लागलें, तर तिथेही पैसा खर्च करून आराम मिळवण्याचा लोक प्रयत्न करतात, आणि इथें पहावें तर हा दूर आफ्रिकेंत इतकें कार्य करून आलेला गृहस्थ अनोळखी शेतकऱ्यांसाठी सर्व प्रकारचे कष्ट सहन करायला तयार आहे. अशा परिस्थितींत आपण मात्र घरीं परत जावे हें कसें दिसेल? पण इकडे मुलाबाळांचीही काळजी होतीच!

रात्रभर विचार केल्यावर, दुसरे दिवशी सकाळी हे दोघे गांधीजींच्या बरोबर कचेरींत निघाले तेव्हा त्यांच्या भावना उफाळून आल्या. त्यांनी स्पष्ट सांगितले - ""आपण कारागृहांत गेल्यावर जरूर पडल्यास आम्हीहि कारागृहांत जाऊं.''

हें ऐकतांच गांधीजींची मुद्रा प्रसन्न झाली. ते अतिशय आनंदानें उद्‌गारले - ""आतां आपल्याला नक्की यश मिळणार!''

तिथें पोंचल्यावर या सर्व गोष्टी त्या दोघा बंधूंच्या तोंडून आम्हाला ऐकायला मिळाल्या. आतां आमच्याही पुढे तुरुंगात जाण्याचा प्रश्‍न उभा राहिलां. आम्हींहि जरुरी पडल्यास तुरुंगवास पत्करण्याचा निश्‍चय केला. आम्हीं आमचा निश्‍चकय गांधीजींना सांग्गितला, तेव्हां त्यांनी कागद घेऊन आम्हां सर्वांची नावे लिहून घेतली. नंतर त्यांनी आमच्या तुकड्या तयार केल्या. या तुकड्यांनी कोणत्या क्रमाने तुरुंगांत जायचें हेंहि ठरवून दिलें. पहिल्या तुकडीचे नेते मजहरूल हकसाहेब होते. दुसरीचे नेते बाबू व्रजकिशोर होते. मलाही एका तुकडीचें नेतृत्व देणअयातआलें. तिथे पोचल्यावर तीनचार तासांतच या या साऱ्या गोष्टी पार पडल्या.
--------
यातील गांधींच्या भेटीचे वर्णन बाबूजींनी अतिशय छान शब्दात केले आहे. ते म्हणतात ""पहिल्याच भेटीत आम्ही स्वखुशीने गांधीजींच्या जाळ्यात सापडलो. जसजसे दिवस गेले तसतसें त्यांच्यावरचे प्रेम वाढले, इतकेच नाही, तर त्यांच्या कार्यपद्धतीवरचा विश्‍वासही वृद्धींगत झाला. चंपारण्य-कांड समाप्त झाले तेव्हा आम्ही सर्व जण त्यांचे अनन्य भक्त झालो होतो व त्यांच्या कार्यपद्धतीचे पक्के पुरस्कर्ते झालो होतो''.
-----------------------
यालाच जोडून पुण्याबद्दल गांधींजींचे मत आणि त्यामुळे डॉ. राजेंद्र प्रसादांना पुण्याचे वाटलेले आकर्षण हेही महत्त्वाचे आहे. किमान त्याआधारे तरी पुण्यातील स्थित्यंतराची तसेच तेव्हाच्या आणि आजच्या पुण्यातील मानसिकतेची तुलना करणे शक्‍य व्हावे.
राजेंद्र प्रसाद म्हणतात, ""एके दिवशी गांधीजींबरोबर मी एका गांवाहून परत येत होतो. रस्त्यांत आमचे संभाषण सुरू झालें. मीं विचारलें - आपण साऱ्या देशांत हिंडतां-फिरतां, कोणत्या कोणत्या भागांतल्या देशसेवेला आपण सर्वश्रेष्ठ मानतां?'' त्यांनी सर्व प्रांतांतली परिस्थिति सांगितली. शेवटीं ते म्हणाले - ""देशसेवकांच्या दृष्टीने पुणें हे तीर्थस्थान आहे. त्या एका शहरांत जितके त्यागी लोक असतील तितके अन्यत्र कुठेंहि नसतील. त्यागाच्या दृष्टीनें तिथल्या संस्था आदर्श निर्माण करणाऱ्या आहेत. नव्या नव्या संस्थाही स्थापन होत आहेत.''

यापूर्वीच फर्ग्युसन कॉलेजचें नांव ऐकलें होतें. महात्माजींशी चर्चा झाल्यावर पुण्याला जाण्याची उत्सुकता आणखीच वाढली. केवळ निर्वाहापुरतेच वेतन घेऊन त्यागी लोक ज्या संस्थेत काम करूं शकतील अशी एक संस्था स्थापन करणे आवश्‍यक आहे असा विचार चंपारण्यमध्येच आमच्या मनांत येऊ लागला.''

पुढे डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणतांत, ""1918 सालीं मुंबईस कॉंग्रेसचे अधिवेशन झालें तेव्हां मी मुंबईला गेलों. तिथून पुण्यालाही गेलों. पुण्यातल्या सर्व संस्थांची लक्षपूर्वक पाहणी करून बरीचशी माहितीही मिळवलीं.''.
(संदर्भ ः राजेंद्र प्रसाद ः आत्मकथा, मराठी अनुवाद - नरेश कवडी, साहित्य अकादमी, नवी दिल्ली, 1958, पृष्ठ - 104 ते 106 आणि पृष्ठ - 117)