मंगळवार, ७ ऑक्टोबर, २००८

राजकारणाचा निकष

राजकारण आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व यांचे नाते अतूट आहे. राजकारणी जर वादातीत असेल तर त्याची सार्वजनिक जीवनात किंमत शून्य. दिल्लीच्या राजकीय रंगमंचावर वावरणारे अमरसिंह हे असेच पात्र आहे. सतत वादाच्या केंद्रस्थानी अन्‌ प्रसिद्धीच्याही झोतात राहण्याची कला त्यांना चांगलीच अवगत आहे. "वादग्रस्त असणे हेच सच्च्या राजकारण्याचे वैशिष्ट्य' हा त्यांचा आवडता सिद्धांत. दिल्लीच्या प्रेसक्‍लबमध्ये आल्यानंतर स्वतःला पत्रकारांच्या फैरीला सामोरे जाताना आपले म्हणणे पटवून देण्यासाठी त्यांची वीरबहादूर सिंग यांचा किस्सा ऐकवला.
""वीरबहादूर सिंग हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री असले तरी कार्यकर्त्यांमध्ये "मंत्रीजी' याच नावाने प्रसिद्ध. ते जेव्हा मालिश करवून घ्यायचे, ती वेळ भेटणाऱ्यांसाठी सर्वोत्तम असे. सारेच जण त्यासाठी टपून बसलेले असत. एकदा मंत्रीजी मालिशचा आनंद घेत असताना एकजण त्यांच्याकडे आला, आणि सरळ गोरखपूरमधून आमदारकीसाठी तिकीट देण्याचीच मागणी केली. मंत्रीजींनी शांतपणे त्याला न्याहाळत "उमेदवारी द्यावी, असा कोणता गुण तुझ्यात आहे', असे विचारले. ""मी वादग्रस्त नाही, हाच सर्वोत्तम गुण आहे,'' असे तो उत्तरला. लगेच मंत्रीजींनी त्याला "चालता हो' म्हणून हुकूम सोडला. उमेदवारी मिळेल या खात्रीने आकाशात असलेला कार्यकर्ता भांबावला. त्याला जमिनीवर आणताना मंत्रीजींचा हितोपदेश केला. ते म्हणाले, ""वादग्रस्त असणे हाच राजकारणासाठी पहिला निकष आहे.''
आपल्या वर्तणुकीच्या समर्थनासाठी अशी थोरामोठ्यांची प्रमाणपत्रे अमरसिंह जोडत प्रसिद्धी पदरात पाडून घेताहेत.
आता बोला.....!