शनिवार, ३ मे, २००८

मोदींना पर्याय नाही

अखेर "अनपेक्षितपणे' मोदींनी गुजरातची गादी राखली आहे. अनपेक्षितपणे यासाठी की सर्वच माध्यमांनी मोदींना बहुमत मिळेल पण काठावर, असा सूर लावला होता. गुजरातच्या जनतेने हे सारे अंदाज पूर्णतः बाजूला सारत आपला तारणहार निवडताना मोदींना पर्याय नाही, हेच स्पष्ट केले. सारी परिस्थिती प्रतिकूल असताना क्रिकेटच्या सामन्यात एखाद्याने एकहाती फटकेबाजी करत सामना जिंकून आणावा, तसेच मोदींच्या विजयाबाबत म्हणावे लागेल.

सर्व देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीच्या निकालांनी माध्यमांच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट केल्या आहेत. एवढेच नव्हे तर दिल्लीतील राजकीय घडामोडींवरही त्याचा परिणाम होणार आहे. धर्माच्या मदतीने राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला जातीच्या राजकारणाला टाळता आले नाही, तर निधर्मी राजकारणाचा टेंभा मिरवणाऱ्या कॉंग्रसची केवळ जातीय राजकारणावरच भिस्त हे या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणता येईल. एकूणच निकाल पाहता त्यातून काही गोष्टी स्पष्ट होणाऱ्या आहेत. त्यातील एक म्हणजे भारतीय जनता पक्षाचे यापुढील राजकारण पूर्णतः मोदी केंद्रीत होणार.

गुजरातच्या विकासामुळे "उत्तम प्रशासक' हे प्रमाणपत्र मिळालेच. परंतु या विजयामुळे ते कसलेले राजकारणी असल्याचेही सिद्ध झाले आहे. कारण हेकेखोर स्वभाव, पटेलांच्या नाराजीचा बागूलबुवा, संघ परिवारातील दिग्गजांमध्ये धुमसत असलेला असंतोष या प्रतिकूल बाबी असतानाच जवळपास 50 हून अधिक आमदारांना मोदींनी अक्षरशः हाताला धरून घरी बसवले. काहींनी उघड नाराजी व्यक्त केली तर काहींनी कॉंग्रेसची वाट धरली. केंद्रीय नेत्यांच्या मर्जीतील काहींनी उमेदवारीसाठी फिल्डींग लावली होती. पण मोदींनी वरिष्ठांच्या शब्दालाही न जुमानता "ये हमारे फ्रेम मे नही बैठते' म्हणत उमेदवारी नाकारली होती. याआधी काही महिन्यांपूर्वी झालेल्या महानगर पालिकांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी सर्व नगरसेवकांना बदलून नव्या चेहऱ्यांना निवडून आणण्याचा विस्तवाशी खेळ खेळला होता. त्यात यश आले असले तरी विधानसभा निवडणुकीत हे शक्‍य होणार नाही, या भ्रमात कॉंग्रेस राहिली. म्हणूनच भाजपच्या बंडखोरांना कॉंग्रेसने पायघड्या अंथरल्या. शिवाय पटेल अस्मितेला हवा देत मोदींच्या विरोधात पटेल उमेदवारही दिला. याचा त्रास मोदींना झालाच नाही, असे नाही. पण त्यावर त्यांनी शोधलेला इलाजही अक्‍सीर राहिला.

हे त्रासदायक होईल याचा मोदींनाही याचा अंदाज होता. म्हणूनच त्यांनी नवे मतदार आणि नवे मतदार संघ शोधले. कॉंग्रेसचा भर पारंपरिक मतदारांवर आणि भाजपच्या नकारात्मक मतांवर राहिला. मोदींच्या स्वच्छ प्रतिमेचा झालेला प्रचार, विरोधात गेलेल्यांची कथित स्वार्थी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यात आलेले यश, बंडखोरांबाबत जाहीरपणे एकही शब्द न बोलणे या साऱ्याच क्‍लृप्त्या मोदींना फायदेशीर ठरल्या. पटेल केंद्रीत राजकारणाला मोदींनी 49 पटेल उमेदवार रिंगणात उतरवून काटशह दिलाच, शिवाय जिंकू शकणारे कॉंग्रेसचे उमेदवारही आपल्या जाळ्यात ओढले. भाजपच्याही उमेदवारांशी जिंकण्याचा निकष कटाक्षाने पाळण्यात आला होता.

जुनागढमधील महेंद्रभाई मश्रू हे नेहमीच अपक्ष म्हणून विजयी होणारे किंवा द्वारका मतदार संघात गेल्यावेळी कांग्रसचे विजयी उमेदवार पबुभा माणेक हे यावेळी खास मोदींचे उमेदवार होते. या दोन उदाहरणांवरूनच काटशहाच्या राजकारणाची कल्पना यावी. मोदींच्या कोणालाही न जुमानणाऱ्या स्वभावाचे, मर्दानी हावभावांचे, हम करे सो कायदा वृत्तीचे गुजराथच्या महिलांमध्ये आकर्षण पाहता मतदारांमध्ये निम्म्याने असलेल्या या मतदारांना आपली "व्होटबॅंक' बनवण्यासाठी मोदींने जे प्रयत्न केले त्याचाही फायदा झालाच आहे. सहा महिन्यांत 36 हून अधिक मेळावे घेत 22 लाख महिलांना एकत्र आणून "मोदी ब्रॅन्ड' त्यांच्यावर ठसवला. शिवाय 22 महिलांनाही उमेदवारी दिली. गुजरातच्या राजकीय इतिहासात कोणत्याच पक्षाने एवढ्या संख्येने महिलांना उमेदवारी दिली नव्हती.

"सारी खुदाई एक तरफ' असताना हा विजय मोदींचे नेतृत्व ठसवणारा आहे. कारण त्यांना अडचणी आणण्यात कॉंग्रेस तर होतीच. पण भाजपचेही मंडळी त्यात मागे नव्हते. माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल, सुरेश मेहता, काशिराम राणा यांचा विरोधाचा पवित्रा उघड होता. विश्‍व हिंदू परिषदेचे प्रविण तोगडीया तर कोठेही दिसून आले नाही. प्रत्यक्ष संघालाही दूर ठेवत मोदींनी स्वतःला पणाला लावत हा डाव खेळला अन्‌ जिंकलाही. मुळात मोदींची प्रतिमा ही हवेत फेकलेल्या मांजरासारखी आहे, जे कसेही फेकले तरी पडताना चार पायावरच पडते. स्तुती असो अथवा टीका असो ती मोदींना फायदेशीरच ठरते, हे "मौत का सौदागर' प्रकरणावरूनच दिसले. "मोदी डर का मार्केटींग करते है' ही कॉंग्रेसच्या नेत्यांची प्रतिक्रीया असली तरी हे मार्केटींग निष्प्रभ करण्याऐवजी कॉंग्रेसने जाहीरनाम्यात दंगलीच्या दोषींवर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. त्याचा उलटा परिणाम झाला. गोध्रा हत्याकांड त्यानंतरची दंगल हे गुजरातच्या इतिहासातील दुर्दैवी क्षण होते. व्यावसायिक मानसिकता असलेल्या बहुसंख्य गुजराथी समाजाला आपला व्यवसाय भला की आपण भले असे वाटत असते. पण आपणही कधी तरी आक्रमक होऊ शकतो, ही अहं सुखावणारी भावना दंगलीतून पुढे आली. म्हणूनच दंगलीच्या "एकदा काय व्हायचे ते होईल, पण "त्यांना' धडा शिकवायलाच हवा' असे म्हणणारा सामान्य गुजराथी माणूस आता ते विसरू पाहतो आहे. तरीही त्याची "गुजरातची अस्मिता' सोहराबुद्दीनच्या मुद्‌द्‌यावरूनही उफाळून येऊ शकते, हे मोदी जोखून असल्याने त्यांनी प्रचाराच्या शेवटच्या क्षणी त्याचा फायदा घेतला.

दंगलीचा कलंक घेऊन वावरणाऱ्या मोदींनी गेल्या काही वर्षांत "विकासपुरूष' ही नवी उपाधी मिळवली आहे. प्रशासनावर मजबूत पकड आणि भ्रष्टाचाराला विरोध हा मोदींचा दावाही सामान्यांना भावला. शहरी भागात मोदींच्या या प्रतिमेचे प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळेच कॉंग्रसचे नेते "मोदींशी आमची लढाई शहरी भागात नाही, तर ग्रामीण भागात राहील' असे खासगीत सांगत होते. शिवाय मोदींच्या सर्वमान्यतेला पर्याय देणारे नेतृत्व कॉंग्रसेला देता आले नाही. गुजरातमध्ये कॉंग्रेस कधी नव्हे तेवढी यावेळी आक्रमक दिसून आली. मोदींच्या विकासाच्या दाव्यांचे वाभाडे काढण्यात कॉंग्रसला बऱ्यापैकी यश आले होते. पण नेता कोण, हे शेवटपर्यंत पक्षाने सांगितले नाही. केंद्रातील अहमद पटेल, प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी, विरोधी पक्षनेते अर्जुन मोढवाडीया की माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला, यातील एकही नाव जाहीर करण्यात पक्ष नेतृत्व बिचकत असल्याचेच चित्र कायम राहिले. एकाची निवड करावी तर बाकी नाराज, पर्यायाने फटका ऐन निवडणुकीत. या भीतीने शेवटपर्यंत राजकीय व्यूहरचनेच्या गोंडस नावाखाली मतभेद दडपून टाकले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गेल्या वेळेसारखा उपद्रव होऊ नये म्हणून चक्क प्रथमच निवडणूकपूर्व आघाडी केली. एक जागा राष्ट्रीय नेते (?) रामविलास पासवान यांच्याही पक्षाला दिली. मुलायमसिंहांच्या समाजवादी पक्षाला उमेदवार उभे करण्यापासून रोखण्यात व मतविभाजन टाळण्यात कॉंग्रेसने यश मिळवले. परंतु त्याचा फायदा घेता आलाच नाही, कारण ठोस नेतृत्वाचा अभाव. भाजप आणि संघ परिवारातील लाथाळ्या आपल्याला सत्तेवर नेऊ शकते या एकाच गणितावर स्वतःला झोकून देणाऱ्या कॉंग्रेसला आपल्या क्षीण ताकदीचा अंदाज आलाच नाही, हेच या निकालातून जाणवते.

राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधींच्या सभेत गर्दी दिसावी म्हणून येणाऱ्या लोकांनी विखरून बसावे यासाठी व्यासपिठावरून जेथे केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जायस्वाल किंवा सुबोधकांत सहाय यांच्या सारख्यांना आवाहन करावे लागते, स्थानिक नेते त्यासाठी अपयशी ठरतात तेथेच कॉंग्रेसची लोकांपासून तुटलेली नाळ दिसून येत होती. पटेलांचे प्रभाव क्षेत्र आणि नाराजीचे केंद्र असलेल्या सौराष्ट्र, दक्षिण गुजरातमध्ये सोनियांना आणि पंतप्रधानांनाही सभा घ्याव्या लागल्या. परंतु त्याचा लाभ मतपेटीतून तरी कॉंग्रेसला झालेला नाही. असे असले तरीही या निवडणुकीचा कॉंग्रेसला एकमेव फायदा म्हणजे "मोदींना आव्हान देणाऱ्या धर्मनिरपेक्ष शक्तींच्या एकमेव नेत्या सोनिया गांधी' या मुद्‌द्‌याचे भांडवल करता येणार आहे. नाही तरी भाजपचे अडवाणींनंतरचे पुढील नेतृत्व म्हणजे मोदी, अशी जाहीरात होऊ लागली आहेच. त्यामुळे त्याचा भावनिक प्रचार करत धर्मनिरपेक्षतेचे आवाहन करत पुन्हा सोनिया गांधींचे नेतृत्व इतरांना स्विकारण्यासाठी भाग पाडण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न राहील. परंतु धर्मनिरपेक्षतेचा वसा सांगणाऱ्या आणि मुस्लिमांचे आपणच तारणहार असल्याचे सांगणाऱ्या कॉंग्रेसने तर मुस्लिम उमेदवारांना टाळले आहे. गुजरातच्या लोकसंख्येत मुस्लिमांचे प्रमाण दहा टक्के. त्या हिशेबाने एकेकाळी 18 मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवणाऱ्या कॉंग्रेसने यावेळी केवळ सातच मुस्लिमांना उमेदवारी दिली. यावर विचारला जाणारा प्रश्‍न कॉंग्रेससाठी अडचणीचा ठरला नाही, तरच नवल.

मुंबईत बॉलिवूड... तर मालेगावात "मॉलिवूड'

जातीय दंगलींमुळे बदनाम झालेलं मालेगाव शहर स्वतःची काही वैशिष्ट्ये अंगाखांद्यावर खेळवत वेगळी ओळख सांगण्याचा प्रयत्न करतं. कधी सुताच्या "ताना-बाना'च्या माध्यमांतून... कधी लुंग्यांच्या माध्यमातून... तर कधी यंत्रमागाच्या धोट्याच्या हालचालींनी कुटुंबाची भाग्यरेषा बदलू पाहणाऱ्या कष्टकरी चेहऱ्यांच्या माध्यमांतून. आता या शहराला "मॉलिवूड'च्या माध्यमातून नवी ओळख मिळू पाहत आहे. मुंबईला ओळखले जाते ते बॉलिवूड या नावाने.

मालेगावातही चित्रपट तयार होत असल्याने बॉलिवूड स्टाईलने मालेगावचे नामांतर झाले आहे "मॉलिवूड'. मालेगावात करमणुकीचा अर्थ केवळ चित्रपट पाहणे हाच होतो. नवा कोणता चित्रपट आला आहे, याची टेहळणी करण्यासाठी चित्रपटगृहांच्या आवारात फेऱ्या मारणे हा येथील कष्टकऱ्यांचा आवडता छंद. शहरात सुमारे 13 चित्रपटगृहे आणि 20 हून अधिक (अधिकृत-अनधिकृत) व्हिडिओगृह आहेत. जुम्म्याला (शुक्रवारी) ही सर्व ठिकाणे हाऊसफुल्ल असतात. चित्रपटांचे वेड असलेल्या प्रत्येकाने हिरोंमधून आपापला एक आदर्श शोधला आहे. त्यातून येथे वेगवेगळ्या हिरोंचे डुप्लिकेटही तयार झाले आहेत. येथे अमिताभ, धर्मेंद्र, शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, संजीवकुमार, अमजद खान आदी कलाकारांचे डुप्लिकेट आहेत. चित्रपट म्हणजे मालेगावकरांच्या सांस्कृतिक जीवनाचे अविभाज्य अंग आहे. येथील चित्रपटनिर्मितीचा इतिहास 30 वर्षांपेक्षा जुना आहे. 1972 मध्ये येथे "कातील खजाना' हा चित्रपट तयार झाला.

अलीकडे काही वर्षांपूर्वी अमिन फ्रूटवाले यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचा संदेश देणारा "दहशतगर' चित्रपट काढला. त्यानंतर गुंडगिरीचे विश्‍व दाखविणारा "मौत का सौदागर' चित्रपटही तयार झाला. येथील व्हिडिओगृहात ते झळकल्यानंतर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नंतर येथील नासीर शेख या तरुणाने "मालेगाव के शोले'ची निर्मिती केली. "शोले'च्या कथानकावर आधारित या चित्रपटाने मालेगावात धमाल उडवून दिली. त्यासाठी निवडलेल्या कलावंतांची चेहरेपट्टी मूळ शोलेतील कलाकारांशी साम्य दर्शविणारी होती. चित्रपटाला "स्थानिक टच' असावा म्हणून शीर्षकात आवर्जून मालेगावचा उल्लेख करण्यात आला होता.

घरगुती अथवा सार्वजनिक समारंभात चित्रीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या व्हिडिओ कॅमेऱ्याने चित्रीकरण झाले. वीरू, जय, गब्बर, ठाकूरच्या भूमिकेतील स्थानिक कलावंतांनीही मेहनत घेतली होती. सुमारे 50 ते 60लोकांनी चित्रपटात काम केले. कथा, पटकथा, संवाद, गीतकार, संगीतकार सबकुछ स्थानिक कलावंत होते. तब्बल सहा महिने चित्रीकरण चालले होते. फक्त "बसंती'च्या भूमिकेसाठी मुंबईत मॉडेलिंग करणाऱ्या तरुणीला बोलाविण्यात आले. त्यासाठीचा मोबदला व तिचे दोन दिवस राहण्याचे हॉटेलचे बिल, एवढाच काय तो मोठा खर्च झाला.

कलावंतांची वेशभूषाही विडंबनात्मकच होती. त्यासाठी लागणारे साहित्य स्थानिक आणि भंगार बाजारातून मिळविण्यात आले होते. काही साहित्यासाठी मुंबईची वारीही करावी लागली होती. गब्बरसिंगच्या गळ्यात लटकणाऱ्या गोळ्यांच्या पट्ट्याऐवजी गुटख्याच्या पुड्यांची माळ देण्यात आली होती. हा चित्रपट मूळ कलाकृतीचे विडंबन होते. थोड्या खर्चात चित्रपट बनवायचा असल्याने घोड्यांऐवजी सायकली, रेल्वेऐवजी बसमध्ये चित्रीकरण, बंदुकीच्या गोळ्या झाडताना तोंडाने "ढिशॉंव' आवाज काढणे, या क्‍लृप्त्या योजण्यात आल्या होत्या. अशा तऱ्हेने अवघ्या 50 हजारांत व सहा महिन्यांत हा चित्रपट तयार झाला. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे व्हीसीआर ते व्हीसीआर या पद्धतीने झालेले एडिटिंग. पूर्ण झाल्यानंतर येथील व्हिडिओगृहांत तो झळकला.

येथील चित्रपटांची प्रसिद्धीची तऱ्हाही अनोखीच आहे. चित्रपटांचे मोठमोठे पोस्टर लावणे, प्रोमोज झळकावणे, जाहिराती करणे या भानगडी येथे नाहीत. शंभर रुपयांत दिवसभरासाठी रिक्षा ठरवावी. त्यावर एक लाऊडस्पिकर बसवून चित्रपटाची तोंडी जाहिरात करणारा एकजण शंभर रुपये देऊन तीत बसवावा. शिवाय प्रमुख भूमिकेत असणारे कलावंतच व्हिडिओगृहाच्या बाहेर थांबून प्रेक्षकांचे स्वागत करतात. याच प्रकारच्या जाहिरातीने प्रेक्षकांचा "मालेगाव के शोले'ला चांगला प्रतिसाद मिळाला. तो चित्रपट महिनाभर चालला.

"...शोले'नंतर "मालेगाव की शान' हा "शान' या कलाकृतीवर आधारित चित्रपट बनविण्यात आला. चित्रीकरणापासून ते प्रदर्शनापर्यंत सर्व पद्धत "...शोले'सारखी. फक्त या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वी सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र घेण्यात आले होते. परंतु "...शोले'च्या तुलनेत "...शान'ला कमी प्रतिसाद मिळाला. येथील बहुतांश चित्रपटांपुढे "मालेगाव' हे जोडलेलेच आहे. चित्रपटांची नावे पाहिल्यास लगेच लक्षात येईल. येथे आतापर्यंत "मालेगाव का डर' (मूळ चित्रपट डर), मालेगाव का डॉन, मालेगाव के करण-अर्जुन, मालेगाव की लगान, मालेगाव का मुन्ना, हम सब पागल है, गंगा जमुना, तीन तिघाडू काम बिघाडू, दुनिया मेरी जेब में, लहू की पुकार, फुटपाथ गर्ल आदी चित्रपट तयार झाले आहेत. काही तयार होत आहेत.

"मालेगाव का मुन्ना' वगळता इतर सर्व चित्रपट जुन्या गाजलेल्या चित्रपटांवर आधारित आहेत. चित्रीकरणाचे स्थळही मालेगाव शहर व परिसरातच आहे. बाहेरगावी जाऊन चित्रीकरण करणे परवडणारे नव्हते. परंतु "तीन तिघाडू काम बिघाडू' चित्रपटासाठी मॉलिवूडने प्रथमच सीमोल्लंघन केले. या चित्रपटातील काही भागांचे चित्रीकरण मुंबई येथे झाले. मॉलिवूड चित्रपटांचे प्रदर्शन आता जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही होत आहे. "अमर अकबर ऍन्थनी' या चित्रपटावर "तीन तिघाडू काम बिघाडू' आधारित आहे. दरम्यान, मालेगावात चित्रपट निघू शकतो आणि चांगला चालूही शकतो, हे सिद्ध झाल्याने नंतर बरेच चित्रपट निघाले, निघताहेत.

किमान पंधरा ते वीस गट या क्षेत्रात असून, आपापल्या परीने चित्रपटांचे विषय निवडून निर्मिती करीत आहेत. चित्रपटांच्या निर्मितीचा खर्च आता वाढला आहे. साधारणतः लाखाच्या घरात गेला आहे. मात्र डिजिटल कॅमेरा व संगणकीय तंत्रज्ञानाची मदतही एडिटिंग, मिक्‍सिंगसाठी होत असल्याने प्रभावी सादरीकरण होत आहे. चित्रपट बनविणारे येथील कलावंतही फार श्रीमंत नव्हेत. कोणी फळविक्रीचा, तर कोणी हातगाडीवर कपडे विक्रीचा व्यवसाय करणारे आहेत. अभिनेतेही त्याच प्रकारचे आहेत. कुणी गॅरेजमध्ये, कुणी जकात नाक्‍यावर, तर कुणी इतर किरकोळ व्यवसाय करतात.