शनिवार, ३ मे, २००८

मुंबईत बॉलिवूड... तर मालेगावात "मॉलिवूड'

जातीय दंगलींमुळे बदनाम झालेलं मालेगाव शहर स्वतःची काही वैशिष्ट्ये अंगाखांद्यावर खेळवत वेगळी ओळख सांगण्याचा प्रयत्न करतं. कधी सुताच्या "ताना-बाना'च्या माध्यमांतून... कधी लुंग्यांच्या माध्यमातून... तर कधी यंत्रमागाच्या धोट्याच्या हालचालींनी कुटुंबाची भाग्यरेषा बदलू पाहणाऱ्या कष्टकरी चेहऱ्यांच्या माध्यमांतून. आता या शहराला "मॉलिवूड'च्या माध्यमातून नवी ओळख मिळू पाहत आहे. मुंबईला ओळखले जाते ते बॉलिवूड या नावाने.

मालेगावातही चित्रपट तयार होत असल्याने बॉलिवूड स्टाईलने मालेगावचे नामांतर झाले आहे "मॉलिवूड'. मालेगावात करमणुकीचा अर्थ केवळ चित्रपट पाहणे हाच होतो. नवा कोणता चित्रपट आला आहे, याची टेहळणी करण्यासाठी चित्रपटगृहांच्या आवारात फेऱ्या मारणे हा येथील कष्टकऱ्यांचा आवडता छंद. शहरात सुमारे 13 चित्रपटगृहे आणि 20 हून अधिक (अधिकृत-अनधिकृत) व्हिडिओगृह आहेत. जुम्म्याला (शुक्रवारी) ही सर्व ठिकाणे हाऊसफुल्ल असतात. चित्रपटांचे वेड असलेल्या प्रत्येकाने हिरोंमधून आपापला एक आदर्श शोधला आहे. त्यातून येथे वेगवेगळ्या हिरोंचे डुप्लिकेटही तयार झाले आहेत. येथे अमिताभ, धर्मेंद्र, शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, संजीवकुमार, अमजद खान आदी कलाकारांचे डुप्लिकेट आहेत. चित्रपट म्हणजे मालेगावकरांच्या सांस्कृतिक जीवनाचे अविभाज्य अंग आहे. येथील चित्रपटनिर्मितीचा इतिहास 30 वर्षांपेक्षा जुना आहे. 1972 मध्ये येथे "कातील खजाना' हा चित्रपट तयार झाला.

अलीकडे काही वर्षांपूर्वी अमिन फ्रूटवाले यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचा संदेश देणारा "दहशतगर' चित्रपट काढला. त्यानंतर गुंडगिरीचे विश्‍व दाखविणारा "मौत का सौदागर' चित्रपटही तयार झाला. येथील व्हिडिओगृहात ते झळकल्यानंतर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नंतर येथील नासीर शेख या तरुणाने "मालेगाव के शोले'ची निर्मिती केली. "शोले'च्या कथानकावर आधारित या चित्रपटाने मालेगावात धमाल उडवून दिली. त्यासाठी निवडलेल्या कलावंतांची चेहरेपट्टी मूळ शोलेतील कलाकारांशी साम्य दर्शविणारी होती. चित्रपटाला "स्थानिक टच' असावा म्हणून शीर्षकात आवर्जून मालेगावचा उल्लेख करण्यात आला होता.

घरगुती अथवा सार्वजनिक समारंभात चित्रीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या व्हिडिओ कॅमेऱ्याने चित्रीकरण झाले. वीरू, जय, गब्बर, ठाकूरच्या भूमिकेतील स्थानिक कलावंतांनीही मेहनत घेतली होती. सुमारे 50 ते 60लोकांनी चित्रपटात काम केले. कथा, पटकथा, संवाद, गीतकार, संगीतकार सबकुछ स्थानिक कलावंत होते. तब्बल सहा महिने चित्रीकरण चालले होते. फक्त "बसंती'च्या भूमिकेसाठी मुंबईत मॉडेलिंग करणाऱ्या तरुणीला बोलाविण्यात आले. त्यासाठीचा मोबदला व तिचे दोन दिवस राहण्याचे हॉटेलचे बिल, एवढाच काय तो मोठा खर्च झाला.

कलावंतांची वेशभूषाही विडंबनात्मकच होती. त्यासाठी लागणारे साहित्य स्थानिक आणि भंगार बाजारातून मिळविण्यात आले होते. काही साहित्यासाठी मुंबईची वारीही करावी लागली होती. गब्बरसिंगच्या गळ्यात लटकणाऱ्या गोळ्यांच्या पट्ट्याऐवजी गुटख्याच्या पुड्यांची माळ देण्यात आली होती. हा चित्रपट मूळ कलाकृतीचे विडंबन होते. थोड्या खर्चात चित्रपट बनवायचा असल्याने घोड्यांऐवजी सायकली, रेल्वेऐवजी बसमध्ये चित्रीकरण, बंदुकीच्या गोळ्या झाडताना तोंडाने "ढिशॉंव' आवाज काढणे, या क्‍लृप्त्या योजण्यात आल्या होत्या. अशा तऱ्हेने अवघ्या 50 हजारांत व सहा महिन्यांत हा चित्रपट तयार झाला. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे व्हीसीआर ते व्हीसीआर या पद्धतीने झालेले एडिटिंग. पूर्ण झाल्यानंतर येथील व्हिडिओगृहांत तो झळकला.

येथील चित्रपटांची प्रसिद्धीची तऱ्हाही अनोखीच आहे. चित्रपटांचे मोठमोठे पोस्टर लावणे, प्रोमोज झळकावणे, जाहिराती करणे या भानगडी येथे नाहीत. शंभर रुपयांत दिवसभरासाठी रिक्षा ठरवावी. त्यावर एक लाऊडस्पिकर बसवून चित्रपटाची तोंडी जाहिरात करणारा एकजण शंभर रुपये देऊन तीत बसवावा. शिवाय प्रमुख भूमिकेत असणारे कलावंतच व्हिडिओगृहाच्या बाहेर थांबून प्रेक्षकांचे स्वागत करतात. याच प्रकारच्या जाहिरातीने प्रेक्षकांचा "मालेगाव के शोले'ला चांगला प्रतिसाद मिळाला. तो चित्रपट महिनाभर चालला.

"...शोले'नंतर "मालेगाव की शान' हा "शान' या कलाकृतीवर आधारित चित्रपट बनविण्यात आला. चित्रीकरणापासून ते प्रदर्शनापर्यंत सर्व पद्धत "...शोले'सारखी. फक्त या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वी सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र घेण्यात आले होते. परंतु "...शोले'च्या तुलनेत "...शान'ला कमी प्रतिसाद मिळाला. येथील बहुतांश चित्रपटांपुढे "मालेगाव' हे जोडलेलेच आहे. चित्रपटांची नावे पाहिल्यास लगेच लक्षात येईल. येथे आतापर्यंत "मालेगाव का डर' (मूळ चित्रपट डर), मालेगाव का डॉन, मालेगाव के करण-अर्जुन, मालेगाव की लगान, मालेगाव का मुन्ना, हम सब पागल है, गंगा जमुना, तीन तिघाडू काम बिघाडू, दुनिया मेरी जेब में, लहू की पुकार, फुटपाथ गर्ल आदी चित्रपट तयार झाले आहेत. काही तयार होत आहेत.

"मालेगाव का मुन्ना' वगळता इतर सर्व चित्रपट जुन्या गाजलेल्या चित्रपटांवर आधारित आहेत. चित्रीकरणाचे स्थळही मालेगाव शहर व परिसरातच आहे. बाहेरगावी जाऊन चित्रीकरण करणे परवडणारे नव्हते. परंतु "तीन तिघाडू काम बिघाडू' चित्रपटासाठी मॉलिवूडने प्रथमच सीमोल्लंघन केले. या चित्रपटातील काही भागांचे चित्रीकरण मुंबई येथे झाले. मॉलिवूड चित्रपटांचे प्रदर्शन आता जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही होत आहे. "अमर अकबर ऍन्थनी' या चित्रपटावर "तीन तिघाडू काम बिघाडू' आधारित आहे. दरम्यान, मालेगावात चित्रपट निघू शकतो आणि चांगला चालूही शकतो, हे सिद्ध झाल्याने नंतर बरेच चित्रपट निघाले, निघताहेत.

किमान पंधरा ते वीस गट या क्षेत्रात असून, आपापल्या परीने चित्रपटांचे विषय निवडून निर्मिती करीत आहेत. चित्रपटांच्या निर्मितीचा खर्च आता वाढला आहे. साधारणतः लाखाच्या घरात गेला आहे. मात्र डिजिटल कॅमेरा व संगणकीय तंत्रज्ञानाची मदतही एडिटिंग, मिक्‍सिंगसाठी होत असल्याने प्रभावी सादरीकरण होत आहे. चित्रपट बनविणारे येथील कलावंतही फार श्रीमंत नव्हेत. कोणी फळविक्रीचा, तर कोणी हातगाडीवर कपडे विक्रीचा व्यवसाय करणारे आहेत. अभिनेतेही त्याच प्रकारचे आहेत. कुणी गॅरेजमध्ये, कुणी जकात नाक्‍यावर, तर कुणी इतर किरकोळ व्यवसाय करतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: