वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आणि एखाद्याचे स्टिंग ऑपरेशन करण्यात समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह यांचा कोणी हात धरू शकणार नाही. त्यांच्या स्टिंगचा धसका भल्याभल्यांनी घेतला आहे. दिग्गज नेते या स्टिंगमुळे अमरसिंहांच्या कह्यात असल्यासारखेच दिसू लागले आहेत. अलीकडच्या काळात अमरसिंह यांची पत्रकार परिषद म्हणजे कोणत्या तरी "स्टिंग'च्या सीडीचे वितरण, असेच समीकरण झाले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांचे नवे शिष्य संजय दत्त यांनी गुरूच्या पावलावर पाऊल ठेवत केंद्रीय कायदामंत्र्यांचेच स्टिंग ऑपरेशन केले.
समाजवादी नेत्यांच्या या एकूणच "स्टिंग'प्रेमामुळे त्यांच्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आलेले इतर राजकीय पक्षांचे नेतेही वचकून आहेत. कॉंग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याशी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकारांशी चर्चा सुरू होती. उत्तर प्रदेशात लखनौमधून आता कॉंग्रेस कोणाला उमेदवारी देणार, यावर प्रत्येक जण अंदाज बांधत होता, तर हा नेताही त्या गप्पा ऐकत होता. मध्येच एकाने "लखनौतून अमरसिंह निवडणूक लढणार आहेत,' असे म्हणताच शांतपणे ऐकणारा नेताही चमकला. इतर काही बोलण्याच्या आधीच त्याने पत्रकारांनाच "स्टिंग थांबवू शकणारे काही जॅमर असते का' असे विचारले. एकाने करोल बाग मार्केटमध्ये ते मिळते असे सांगितले, तर दुसरा ते जॅमर वायरलेस कॅमेऱ्यालाच चालते असे सांगत होता.
तेवढ्यात त्या नेत्याने समोरच कागद फाडत "करोल बाग' म्हणणाऱ्या पत्रकाराला नजरेनेच "पत्ता लिहून दे' असे खुणावले. अन् हा नेता म्हणाला, ""आता या मोसमात सावध राहावे लागते आहे. कोण कधी आपले स्टिंग करून पत्ता कापेल सांगता येत नाही.'' पण त्यापुढील या नेत्याचे वाक्य महत्त्वाचे होते. तो म्हणाला, ""खरोखर कुणी तरी अमरसिंहांना निवडणूक लढवायला सांगा. आमची इच्छा आहे की त्यांनी निवडणूक लढवावी.'' अर्थात, "यातले शेवटचे वाक्य हे "सल्ला' होते की "सुप्त आव्हान' होते, हे मात्र कळाले नाही.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा