""देशात मुस्लिमांनी आजपर्यंत सर्व राजकीय पक्षांवर विश्वास ठेवला. पण कोणीही त्यांच्या अपेक्षांकडे लक्ष दिलेले नाही.'' , राजकीय नेत्यांकडून सातत्याने वापरले जाणारे हे वाक्य घासून गुळगुळीत झालेल्या नाण्यासारखेच आहे. परंतु, एखादा मुस्लिम नेता त्याचा देशव्यापी राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी तसे बोलत असला तर हे वाक्य मुस्लिम मतांवर अवलंबून राहणाऱ्या प्रस्थापित राजकीय पक्षांच्या पायाखालची वाळू घसरविणारे असते. नेमकी हीच स्थिती आसाममधील अत्तर सम्राट मौलाना बद्रुद्दीन अजमल यांनी निर्माण केली आहे. भाजपला सत्तेपासून रोखणे हे मुस्लिम मतदारांचे प्रमुख उद्दीष्ट असल्याने ते स्थानिक मतदार संघांमधील परिस्थिती पाहून वेगवेगळ्या पक्षांना मतदान करतात. हीच मते एकत्र करणारा राष्ट्रीय पक्ष बनविण्याचा त्यांचा मानस आहे.
ैलाना अजमल यांचे वय फक्त 50 वर्षे. देवबंद विद्यापीठाची फाजील-ए-देवबंद ही पदवी मिळविणारे अजमल हे "जमात उलेमा हिंद' या संस्थेचे सदस्यही आहेत. शिवाय त्यांचा मुख्य व्यवसाय अत्तर आणि सुगंधी द्रव्य निर्मितीचा असून तो मुंबईसारखे महानगर आणि मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्ये पसरलेला आहे. साहजिकच धार्मिक क्षेत्राबरोबरच व्यापारी वर्गातही उठबस. त्यातूनच आसाममधील विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी स्थापन केलेल्या "आसाम युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट' या पक्षाने दहा जागा जिंकल्या. आसाममध्ये मुस्लिम मतदारांना साद घालत मिळवलेले हे यश महत्त्वपूर्ण होते. पक्ष निर्मितीनंतरच्या अवघ्या सहा महिन्यात हे यश मिळाल्याने साहजिकच सच्चर अहवालातील उल्लेखाप्रमाणे मुस्लिमांना आरक्षण, हा प्रमुख मुद्दा बनवत देशभरातील मुस्लिमांना एकाच राजकीय व्यासपिठावर आणण्याचा प्रयत्न अजमल यांनी सुरू केला.
देशात 2001 च्या जनगणनेनुसार मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण सुमारे साडेतेरा टक्के. तर मुस्लिमांची सर्वाधिक लोकसंख्या उत्तरप्रदेश (साडेअठरा टक्के), बिहारमध्ये (साडेसोळा टक्के) एकवटलेली. त्याखालोखाल झारखंड (साडेतेरा ते चौदा टक्क्यांच्या आसपास) आणि महाराष्ट्रात (सुमारे साडेदहा टक्के). मुस्लिमांसाठी वेगळ्या राजकीय पक्षाचे प्रयोग मुस्लिम लीग नंतर वेगवेगळ्या ठिकाणी राबविले गेले. पण ते केवळ राज्यस्तरीय होते. विद्यमान मुस्लिम लीगचा प्रभाव केरळमध्ये मलाबार किनारपट्टी आणि काही भागात आहे. तर उत्तर प्रदेशात पीपल्स डेमोक्रेटीक फ्रंट (पीडीएफ) आणि जामा मशिदीचे इमाम अहमद बुखारी यांचा उत्तर प्रदेश डेमोक्रेटीक फ्रंट असे दोन पक्ष आहेत. त्यामुळे राष्ट्रीयस्तरावर मुस्लिमांचा वेगळा पक्ष असावा यासाठी झपाटेल्या मौलाना अजमल यांनी देशभरात भटकंती करून मुस्लिम समाजातील वेगवेगळ्या घटकांशी संवाद साधला. यात धार्मिक, बुद्धीजीवी वर्गापासून ते कष्टकऱ्यांपर्यंतच्या सर्व स्तरातील लोकांचा समावेश होता.
राष्ट्रीय पक्ष स्थापण्यातील अडचण लक्षात आल्यानंतर बिहारमध्ये बिहार युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंट, उत्तर प्रदेशात उत्तरप्रदेश युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंट, झारखंडमध्ये झारखंड युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंट आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंटच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला. यात मिळणाऱ्या मतांच्या टक्केवारीनंतर चारही फ्रंट एकत्र करून राष्ट्रीय पक्ष बनविण्याचा मौलाना अजमल यांचा मानस आहे. त्यासाठी देशातील 543 लोकसभा मतदार संघांमधील 80 मतदार संघांमध्ये निर्णायक ठरणारी मुस्लीमांची मते मिळविण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा