सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

राजधानी दिल्ली : वाढती बेरोजगारी, घटती गुंतवणूक

वाढलेली बेरोजगारी, गुंतवणूकदारांनी आखडता घेतलेला हात आणि एकूण अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ अशी संकटाची मालिका समोर असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन नव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवारी मांडणार आहेत. त्यांच्यापुढे आव्हान आहे ते अर्थव्यवस्थेची घसरणारी गाडी सावरण्याचे.

कीकडे आत्मनिर्भर नवभारताचे रंगविले जाणारे स्वप्न आणि दुसरीकडे सरकारचे घटलेले उत्पन्न, खर्च वाढविण्याची चिंता, वाढत्या महागाईच्या बसणाऱ्या झळा, वाढलेली बेरोजगारी, गुंतवणूकदारांनी आखडता घेतलेला हात, अशी संकटाची मालिका समोर असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन नव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवारी मांडणार आहेत. त्यांच्यापुढे आव्हान आहे ते अर्थव्यवस्थेची घसरणारी गाडी सावरण्याचे. त्यामुळे उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्याची निवडणूक होत असतानाही लोकानुनयी घोषणांऐवजी आर्थिक शिस्तीच्या संकल्पाचेच दडपण अर्थमंत्र्यांवर असेल.

या अर्थसंकल्पाकडून साऱ्या अर्थतज्ज्ञांची एकच अपेक्षा आहे ती म्हणजे अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर करण्यासाठी सरकारने आपला खर्च वाढवावा.याचे कारण आधीची आर्थिक घसरण आणि त्यात कोरोना महासाथ आणि टाळेबंदीची पडलेली भर, यामुळे असंघटित क्षेत्रातील रोजगारांवर, सूक्ष्म, लघु, मध्यम क्षेत्रातील अनेक उद्योग व्यवसायांवर याचा प्रतिकूल परिणाम होऊन बेरोजगारी आणि गरीबी वाढली आहे. तसेही, सरकारने टाळेबंदी किंवा महासाथ रोखण्यासाठीच्या निर्बंधात्मक उपायांमुळे उपासमार होऊ नये म्हणून ८२ कोटी लोकांना निःशुल्क अन्नधान्याचा पुरवठा करून अप्रत्यक्षपणे एवढे लोक गरीब आहेत, हे मान्य केलेच आहे. त्याला दुजोरा ‘ऑक्सफॅम’ आणि पीपल्स रिसर्च ऑॅनलाईन इंडियाज कन्ज्युमर इकॉनॉमी या संस्थांनी आपल्या अध्ययनातून दिला आहे.

गरीबी वाढली

‘ऑक्सफॅम’चा ताज्या अहवालानुसार कोरोना महासाथीच्या काळात देशात ८४ टक्के कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न घटले असून ४.६ कोटीहून अधिक भारतीय कुटुंबे गरीबीच्या खाईत ढकलली गेली. तर, दुसरा अहवाल म्हणतो, की देशातील १५ कोटी गरीब कुटुंबांचे उत्पन्न ५३ टक्क्यांनी घटले. एकूण काय तर गरीबी वाढली असून त्याला महागाईची जोड मिळाली आहे. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई ५.५९ टक्क्यांपर्यंत गेली आणि खाद्यपदार्थांची महागाई चार टक्क्यांपेक्षा अधिक झाली. मागील दोन वर्षात जवळपास सर्वांचेच आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत आटले असताना त्यात महागाईचा दणका मारक ठरला आहे. उच्चमध्यमवर्गीय किंवा नवश्रीमंतांचीही खर्चाच्या बाबतीत फारशी वेगळी स्थिती नाही. नव्या वाहनांची नोंदणी घटणे, विमानाने प्रवास करणाऱ्यांची कमी झालेली संख्या, निर्बंधांमुळे मनोरंजनासाठी बाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत झालेली घट ही त्याची काही उदाहरणे. रेल्वे मालवाहतुकीत घट होणे आणि विजेची मागणीही सरासरीच्या तुलनेत कमी होणे यातून उद्योग क्षेत्रातील उदासिनता दिसते.

गरीबीप्रमाणेच बेरोजगारीचा मुद्दाही अक्राळविक्राळ झाला आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे आणि प्रत्यक्ष रोजगार देणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सरकारी नोकऱ्यांबद्दल तर बोलायलाच नको. सरकारच्या नोकऱ्या नाहीत आणि रिक्त जागांसाठी भरतीही नाही. यामुळे तरुणांमध्ये वाढलेला रोष, रेल्वेच्या भरती प्रक्रियेतील गोंधळानंतरच्या संतप्त उद्रेकातून दिसून आला आहे आणि निवडणुकांमध्ये बेरोजगारीचा मुद्दा प्रचारात येऊ नये यासाठी सरकारची उडालेली तारांबळही यातून दिसली आहे. परंतु, रेल्वेच्या ३५ हजार २६१ जागांसाठी सव्वा कोटी अर्ज येणे म्हणजे एका पदासाठी ३५४ दावेदार असणे आणि भरती झाली तरीही प्रत्येक पदागणीक ३५३ जणांचे नोकरीपासून वंचित राहणे, यातून तेवढ्या प्रमाणात नोकऱ्या नाहीत हे वास्तव उरतेच. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये उफाळलेला हिंसाचार ही एक स्वतंत्र घटना नव्हे, तर एका अर्थाने बेरोजगारीच्या समस्येचे प्रतिबिंब आहे. ही समस्या आधीपासून होतीच. पण कोविडच्या काळात ती आणखी गडद झाली आहे.

पतमानांकन करणाऱ्या ‘इंडिया रेटिंग्ज’च्या मते, उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबित्व वाढत आहे. शेतीवरील मनुष्यबळाचे अवलंबित्व कमी करून ते उत्पादन क्षेत्राकडे, कारखान्यांकडे वळविण्याचा सरकारचा प्रयत्न होता. परंतु, ‘राष्ट्रीय सांख्यिकी संस्थे’च्या श्रम सर्वेक्षणानुसार २०१८-१९च्या तुलनेत २०१९-२० मध्ये रोजगारासाठी कृषी क्षेत्राकडे वळण्याचे प्रमाण वाढले. ही आकडेवारी कोविड संकटाच्या आधीची होती. टाळेबंदीनंतर स्थलांतरित कष्टकरी शहराकडून गावाकडे गेले आणि नंतरच्या निर्बंधांमुळे ते ग्रामीण भागातच स्थिरावल्याने पुन्हा शेतीवर आणखी भार वाढण्याची चिन्हे आहेत.

ग्रामीण भागात किमान रोजगारासाठी मनरेगा सारख्या योजना तरी आहेत. पण शहरी भागातील वाढत्या बेरोजगारीचे काय हा देखील चिंताजनक प्रश्न आहे. सीएमआयई (सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी) या संस्थेच्या अध्ययनानुसार डिसेंबरमध्ये देशातील बेरोजगारीचा दर ७.९ टक्के होता, जो चार महिन्यांतील सर्वोच्च आहे. त्यातही शहरी भागातील बेरोजगारीचा दर ९.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, श्रम मंत्रालयाच्या आस्थापनांशी संबंधित दुसऱ्या त्रैमासिक सर्वेक्षण अहवालातूनही मर्यादित स्वरुपातच रोजगार वाढल्याचे दिसते. वर्तमान आर्थिक वर्षाच्या (२०२१-२२) जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत नऊ निवडक क्षेत्रांमध्ये दोन लाख लोकांना रोजगार मिळाल्याचे श्रम मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोना संकट आणि टाळेबंदी काळात रोजगार गमावेल्यांच्या तुलनेत हा आकडा नगण्य आहे.

सरकारी खर्च कमी

आधीच सरकारचा विकासदर वाढीचा आकडा धापा टाकताना दिसतो आहे. बाजारात उठाव नाही. खासगी क्षेत्राकडून होणारी खरेदी ठप्प आहे. नवी गुंतवणूक अपेक्षित प्रमाणात आलेली नाही. मग उरतो, तो सरकारी खर्च. गेल्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर सुमारे साडेपाच लाख कोटी रुपये खर्चाची घोषणा झाली होती. परंतु प्रत्यक्षात केंद्र सरकार पायाभूत सुविधांच्या खर्चात फारशी वाढ करू शकले नाही. एवढेच नव्हे तर, मावळत्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पी तरतुदीपैकी राष्ट्रीय गुंतवणूक वाहिनी, डिजिटल इंडिया, जलजीवन मिशन यासारख्या योजनांवर निम्मी रक्कमही अद्याप खर्च झालेली नाही. याखेरीज, आर्थिक प्राप्ती कमी आणि जास्तीचा खर्च यातून वाढत जाणाऱ्या वित्तीय तुटीच्या नियंत्रणाची चिंता आहेच. निर्गुंतवणुकीतून १.७५ लाख कोटी रुपये मिळविण्याचे उद्दिष्ट सरकारला साध्य झालेले नाही. सरकारवर कर्जाचा आणि कर्जावरील व्याजाचा बोजाही वाढतो आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले, तर मावळत्या वर्षात सरकारला मिळालेल्या दर १०० रुपयांच्या महसुलातील ४५ रुपये व्याजावर खर्च करावे लागत आहेत. नव्या आर्थिक वर्षात सरकारी कर्जाची रक्कम १२ ते १४ लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते.

साहजिकच यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांपुढे खऱ्या अर्थाने आव्हान असणार आहे, ते १) अर्थव्यस्थेला चालना देण्यासाठी पायाभत सुविधांच्या खर्चात वाढ करण्याचे, २) गरीबांना दिलासा देणाऱ्या उपाययोजनांचे ३) बाजारातील उलाढालीला गती देण्यासाठी सर्वसामान्यांची क्रयशक्ती वाढविण्याचे ४) असंघटीत क्षेत्राच्या मदतीसाठी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना आर्थिक संजिवनी देण्याचे (कारण, सरकारी बॅंकांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना वित्त पुरवठा करण्यात हात आखडता घेतल्याचे रिझर्व बॅंकेलाच आढळून आले होते) ५) परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याचे आणि महत्त्वाचे म्हणजे ६) २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे. कारण, यंदाचे वर्ष २०२२ आहे आणि २०१८-१९ मधील एका पाहणीनुसार भारतीय शेतकऱ्यांना जमीन कसण्यातून मिळणारे दैनंदिन उत्पन्न होतो अवघे २७ रुपये!

(प्रसिद्धी दिनांक - ३१ जानेवारी २०२२, दै. सकाळ)  राजधानी दिल्ली


सोमवार, २४ जानेवारी, २०२२

अधिकारांचा संकोच; राज्यांचा रोष

 संघराज्य व्यवस्थेत केंद्र आणि राज्य सरकारे यांच्या कामकाजात समन्वय आणि सौहार्द अपेक्षित असतो. तथापि, केंद्राच्या गेल्या काही दिवसांतील निर्णयांमुळे अधिकाधिक अधिकार केंद्राकडे एकवटण्याचा प्रकाराने राज्य सरकारांमध्ये अस्वस्थता वाढीला लागली आहे.


धिकारांवरून केंद्र आणि राज्य यांच्यामधील वादावादी पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांच्या चित्ररथांना स्थान नाकारले गेल्यानंतर त्यांनी संघराज्य व्यवस्थेचा हवाला देत केंद्र सरकारविरुद्ध जोरदार नाराजी व्यक्त केली होती. आता यामध्ये भर पडली आहे ती सनदी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीसंदर्भातील नव्या नियमावलीमुळे. जोडीला उद्योगानुकुलता वाढविण्यासाठी विकास प्रकल्पांना पर्यावरणीय मंजुरी देण्यासाठीच्या तारांकित मानांकनाचा (स्टार रेटींग) प्रस्तावही आहेच.

साहजिकच, या नाराजीची व्याप्ती केवळ वर उल्लेखलेल्या राज्यांपुरती मर्यादित राहणार नसून विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या इतर राज्यांपर्यंत याचा संसर्ग होणार आहे. आधीच संघराज्य व्यवस्थेबद्दल केंद्र सरकारच्या उक्ती आणि कृतीमध्ये जमीन अस्मानाचा फरक असल्याचा राज्यांकडून होणारा आरोप नवा नाही. जीएसटीच्या थकबाकीच्या निमित्ताने राज्यांच्या आर्थिक अधिकारांवर गदा येण्याचे उदाहरण ताजे आहे. शिवाय, राज्यपालांना राज्यांमधील केंद्र पुरस्कृत योजनांवर लक्ष ठेवण्यासाठी सुचविल्याने आपल्या अधिकारांचा संकोच झाल्याने राज्यांच्या जिव्हारी लागणारा आहे. अशाच एका संघर्षाच्या मुद्द्यावर सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणेला महाराष्ट्र सरकारने प्रतिबंध केला होता आणि केंद्र-राज्यातील लढाई किती टोकदार होऊ शकते, हे दाखविले होते. तसेही महाराष्ट्राआधी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या सरकारने आपल्या वेगळ्या शैलीत या संघर्षाची चुणूक दाखविली होती. केरळमध्ये तसेच महाराष्ट्रात विद्यापिठांमधील नियुक्त्यांबद्दलच्या राज्यपालांच्या कुलपती पदाच्या अधिकारांना कात्री लावणाऱ्या विधेयकाची मंजुरी ही या संघर्षाची पुढची पायरी म्हणता येईल.

सनदी अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती

आताचा मुद्दा हा, अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीच्या नियमावलीच्या निमित्ताने पुन्हा आपली कोंडी करण्याचा केंद्राचा डाव असल्याची राज्यांमध्ये भावना वाढीस लागण्याशी निगडीत आहे. सनदी अधिकाऱ्यांची संख्या पुरेशी असूनही राज्यांकडून या आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना केंद्रीय सेवेत प्रतिनियुक्तीवर पाठविले जात नसल्याने केंद्र सरकारच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे केंद्राच्या कार्मिक प्रशिक्षण मंत्रालयाचे (डीओपीटी) म्हणणे आहे.

राज्यांकडून १९५५च्या आयएएस नियमावलीनुसार राज्याच्या एकूण संवर्गापैकी ४० टक्के अधिकाऱ्यांना केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर पाठविण्याची तरतूद आहे. २०११ मध्ये प्रतिनियुक्तीचे प्रमाण सरासरी २५ टक्क्यांपर्यंत होते. ते आता १८ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. केंद्राचे कामकाजच या अधिकाऱ्यांकडून होत असते. परंतु गेल्या काही वर्षांत राज्यांकडून अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याचे कारण देत त्यांना केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर न पाठविण्याचे प्रकार वाढले आहेत. सरकारच्या दाव्यानुसार उपसचिव आणि संचालक स्तरावरील एकूण अधिकाऱ्यांची संख्या देशात दुप्पट प्रमाणात वाढूनही राज्यांकडून प्रतिनियुक्तीवर पाठविल्या जाणाऱ्या या श्रेणीच्या अधिकाऱ्यांची संख्या तुरळकच आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी १९५५ च्या आयएएस नियमावलीत सुधारणा केली जात असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. परंतु, या सुधारणेमध्ये अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीबद्दल केंद्र सरकारचा शब्द अंतिम राहील, ही इशारेवजा बाब राज्यांची अस्वस्थता वाढविणारी आहे.

‘डीओपीटी’ने प्रस्तावित नियम सुधारणेबाबत राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की केंद्रीय सेवेत गरजेनुसार विशिष्ट परिस्थितीमध्ये एखाद्या राज्य संवर्गाच्या अधिकाऱ्याची मागणी केंद्र सरकार करू शकते आणि राज्य सरकारला aया मागणीची पूर्तता ठरलेल्या वेळेत करावी लागेल. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, राज्य सरकारांनी केंद्राच्या निर्णयाची ठरलेल्या कालावधीत अंमलबजावणी न केल्यास, संबंधित अधिकारी केंद्राने आदेश दिलेल्या तारखेपासून राज्याच्या संवर्गातून मुक्त होतील. या प्रस्तावांवर २५ जानेवारीपर्यंत राज्यांकडून त्यांचे म्हणणे केंद्राने मागविले आहे. यातील ‘विशिष्ट वेळ’ आणि ‘विशिष्ट परिस्थिती’ यांची व्याख्या स्पष्ट नसल्याने या निकषांचा राजकीय कारणासाठी वापर झाला तर काय, ही राज्यांना वाटणारी भीती अगदीच अनाठायी देखील नाही.

विशेषतः सध्याच्या महासाथीच्या परिस्थितीमध्ये ज्यात महासाथ नियंत्रण कायदा लागू असताना सर्व राज्यांच्या यंत्रणा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अवलंबून आहेत. त्यामुळे या प्रकारचे प्रशासकीय नियंत्रण राज्यांची चिंता वाढविणारे आहे. शिवाय, केंद्रात प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना आपल्या पद्धतीचे प्रशिक्षण देऊन राजकीय उद्दीष्टांसाठी वापरण्याचे प्रकार तर राज्यांना आणखी त्रस्त आणि बेजार करणारे आहेत. अशा अधिकाऱ्यांचा वापर करून निवडणूक काळात पक्षांतरासाठी आमिष दाखविले गेल्याचे, दबाव आणल्याचे प्रकार लपून राहिलेले नाहीत. महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या गाजलेल्या फोन टॅपिंग प्रकरणातील अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवरील बदल्या याचे एक उदाहरण म्हणता येईल.

साहजिकच, केंद्रात प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठविण्यातील उदासिनतेमागे राज्यांची ही भीती देखील आहे. पश्चिम बंगालने २८० पैकी ११, राजस्थानने २४७ पैकी १३ आणि तेलंगणाने २०८ पैकी सात अधिकाऱ्यांना केंद्रात पाठविणे याचा केंद्र सरकारच्या कामकाजावर परिणाम नक्कीच होईल. परंतु याचा अर्थ असा आजिबात नव्हे की, प्रतिनियुक्तीच्या नियमात बदल करताना राज्यांशी सल्लामसलतच केली जाऊ नये, जो संघराज्य व्यवस्थेचा गाभा राहिला आहे. याच श्रेणीतला दुसरा प्रकार म्हणजे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने, पायाभूत सुविधा प्रकल्पांना राज्यांकडून अल्प काळात मंजुरी मिळावी यासाठी पर्यावरणावरील परिणामांचे आकलन करणाऱ्या राज्यांच्या प्राधिकरणांसाठी लागू करण्याचा विचार असलेली तारांकित मानांकनाची (स्टार रेटींग) पद्धत. यामध्ये जी राज्ये कमीत कमी कालावधीत प्रकल्पांना पर्यावरणीय मंजुरी देतील, त्यानुसार त्यांचा गुणानुक्रम ठरेल. ८० दिवसांपेक्षा कमी काळात मंजुरी दिल्यास दोन, तर १०५ दिवसांसाठी एक गुण आहे. त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी शून्य गुण मिळतील. या पद्धतीत पर्यावरणावरील परिणामांचे आकलन करणाऱ्या राज्यांच्या प्राधिकरणांसाठी नव्या अटी लागू होतील.

यात राज्यांच्या प्राधिकरणांकडून पर्यावरणावरील परिणामांचा आढावा घेतला जाणार असला तरी, ज्यात वन जमिनींचा समावेश होतो, अशा प्रकल्पांमध्ये केंद्राद्वारे नियुक्त समिती मंजुरी देईल. तर, खाण, बांधकाम, लघुउद्योग यासारख्या प्रकल्पांना राज्यांचे प्राधिकरण मंजुरी देईल. म्हणजेच, प्रदूषण, पर्यावरण हे राज्यांच्या अखत्यारीत येणारे विषय असताना या विकास योजनांचा राज्यांच्या पर्यावरणावर नेमका कसा परिणाम होईल, प्रतिकूल असल्यास त्यातून होणारे नुकसान कसे कमी करता येईल याचे मूल्यांकन करण्याऐवजी, विकास प्रकल्पाच्या योजना लवकरात लवकर मार्गी लावण्यावर राज्यांनी भर द्यावा, हेच यातून अपेक्षित असल्याचे दिसते. राज्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास मानांकन घसरण्याचा आणि गुंतवणुकीवर परिणाम होण्याचा बडगा देखील आहे. म्हणजे पुन्हा राज्यांना केंद्रावर अवलंबून राहावे लागेल.

आधीच, केंद्राकडून राज्यांचे राजकीय आणि आर्थिक अधिकार डावलले जात असल्याचा आरोप भाजपेतर पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांकडून सातत्याने होतोच आहे. या यादीमध्ये आता प्रशासकीय अधिकारांची भर पडणारी असल्यास, सर्वाधिकार केंद्राकडे एकवटण्याचा प्रकार केंद्रित राज्यव्यवस्थेकडे जाणारा किंवा एकचालकानुवर्तित्वाकडे जाणारा ठरेल. जो लोकशाही व्यवस्थेसाठी घातक आहे.

(प्रसिद्धी दिनांक - २४ जानेवारी २०२२, दै. सकाळ) राजधानी दिल्ली

सोमवार, १७ जानेवारी, २०२२

रेल्वेच्या खडखडाटामागचे गणित!

 सारे काही चांगले असते तेव्हा खासगी क्षेत्राच्या कार्यक्षमतेचे गोडवे गायले जातात. पण संकट येते तेव्हा सरकारी यंत्रणाच उपयोगाला येते; मग ती आरोग्यासाठी असो किंवा वाहतुकीसाठी असो. येत्या अर्थसंकल्पात रेल्वे आणि सर्वसामान्य प्रवाशांबद्दल विचार व्हावा, ही अपेक्षा आहे.

र्थसंकल्पात अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून मध्यमवर्गीयांसाठी प्राप्तिकरातील सवलत निघणार की नाही याचे जेवढे कुतुहल असे, तेवढीच उत्कंठा रेल्वे अर्थसंकल्पाबद्दल असे. अलिकडे रेल्वेचा जमा-खर्च केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये विलीन झाला असला तरीही, रेल्वेच्या घडामोडींद्दलची उत्सुकता बदललेली नाही. रेल्वेची ही आठवण होण्याचे कारण म्हणजे आगामी अर्थसंकल्पही आहे, परंतु दिल्लीत रफी मार्गावरील रेल्वे मंत्रालयाची इमारत असलेल्या रेल भवनाच्या दर्शनी भागात असलेले वाफेचे जुने इंजिन हटवून 'वंदे भारत' या नव्या रेल्वेचे आकर्षिक इंजिन बसविण्यातून दिला जाणारा संदेशही आहे.

स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त देशात १५ आॅगस्ट २०२३ पर्यंत अतिवेगवान श्रेणीच्या आणि आधुनिक सुखसोयी असलेल्या ७५ वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागच्या वर्षी १५ आॅगस्टला लाल किल्ल्यावरून केली होती. त्यापार्श्वभूमीवर, वाफेचे इंजिन ते बुलेट ट्रेनच्या तोंडावळ्याचे आधनिक इंजिन या बदलातून रेल्वेचा नवा अवतार कसा असेल हे दर्शविण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे.

सध्या दिल्ली वाराणसी आणि दिल्ली कटरा अशा दोन वंदे भारत गाड्या धावत असून २०२३ पर्यंत त्यांची संख्या ७३ ने वाढेल. लोकसभेच्या निवडणुकीचे वर्ष २०२४ आहे. त्यात आधुनिकतेचे, विकासाचे गुलाबी चित्र रंगविण्यासाठी या गोष्टींचा उपयोग होईल, हे वेगळे सांगायला नको. थोडक्यात, केंद्रातल्या वर्तमान सत्ताधाऱ्यांना जो मध्यमवर्ग आपला मतदार वाटतो, त्या वर्गापुढे भव्य इमारती, चकचकीत गाड्या, माॅलसारखी रेल्वेस्थानके असा दृष्य विकास मांडण्याचा ही खेळी आहे.

रेल्वेच्या नव्या योजनांच्या केवळ घोषणा करून त्या कागदावर राहण्याऐवजी व्यवहार्य योजना पूर्ण करण्याची विद्यमान सरकारने घेतलेली भूमिका स्तुत्य आहे. पण रेल्वे ही आतापर्यंत सामाजिक जबाबदारी, गरीबांचे वाहतूक साधन राहिली असताना, रेल्वेला नव्या व्यावसायिक मार्गावर नेताना जो खडखडाट होतो आहे त्यामुळे रेल्वेचे कर्मचारीही खूश नाहीत आणि प्रवाशांनाही समाधान नाही, याचाही विचार व्हायला हवा.

रेल्वेचा आर्थिक प्राप्तिसाठी होणारा खर्च म्हणजेच आॅपरेटिंग रेशो सरकारच्या म्हणण्यानुसार ९८ टक्के आहे. तर, कॅगच्या तपासणीतून हे प्रमाण ११४ ते ११६ टक्क्यांपर्यंत असल्याचे आढळले. याचाच अर्थ, १०० रुपये कमविण्यासाठी ९८ रुपये खर्च करत असल्याचा सरकारचा दावा असला तरी प्रत्यक्षात १०० रुपयांच्या प्राप्तिसाठी तब्बल ११६ रुपयांपर्यंत होणारा रेल्वेचा खर्च चिंताजनक पातळीवर पोहोचला असून रेल्वेची आर्थिक प्रकृती फारशी चांगली नाही हे यातून स्पष्ट दिसते. रेल्वेला २६३८८ कोटी रुपयांचा तोटा असल्याचे कॅग ला आढळले होते.

या निमित्ताने रेल्वे तोट्यात असल्याचा आणि ती फायद्यात आणण्यासाठी रेल्वेच्या प्रत्येक सेवेसाठी प्रवाशांनी पैसे मोजावे हा सरळसरळ व्यवहारी पवित्रा सरकारने घेतल्याचे दिसते. कोरोना काळातील निर्बंधांच्या निमित्ताने हा पवित्रा आक्रमकपणे प्रवाशांच्या गळी उतरविण्याचा प्रकार दिसतो आहे.

रेल्वेच्या प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक करणाऱ्या जवळपास साडेतेरा हजार गाड्या धावतात. कोरोनामुळे २०२० मध्ये देशभरातील टाळेबंदीमुळे रेल्वेची गती थिजली. प्रवासाचे सर्वात स्वस्त साधनच बंद झाल्याने स्थलांतरित मजुरांचे तांडेच्या तांडे रस्त्यावरून चालत निघाले. अखेर दबावामुळे सरकारला विशेष रेल्वेगाड्या सुरू कराव्या लागल्या.

कोविड काळात रेल्वेची प्रवासी वाहतुकीतून होणारी कमाई लक्षणीयरित्या घटली. प्रवासी वाहतकीतून रेल्वेला २०१९-२० मध्ये ५०,६६९ कोटी रुपये मिळाले होते. २०२०-२१ मध्ये अवघे १५२४८ कोटी रुपये मिळाले. रुग्ण, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांच्या श्रेणींचा अपवाद वगळता, प्रवास भाड्यात दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती २० मार्च २०२० पासून थांबविण्यात आल्या. या सवलतींमुळे २०१९-२० मध्ये २०५९ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. नंतर टाळेबंदीच्या काळात प्रवासी संख्या कमी असूनही सवलतींवर २०२०-२१ मध्ये ३८ कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. आता पॅसेंजर गाड्या सोडून जवळपास सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्या सुरू झाल्या, परंतु सवलती नाहीत. त्या अव्यवहार्य असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.

कोरोना काळातील मालवाहतूक आणि इतर गोष्टींमधून मिळणारा महसूल जवळपास ३८१९ कोटी रुपयांनी वाढला. पण प्रवासी वाहतूक बंद राहिल्याने ३५४२० कोटी रुपयांचा तसेच कोचिंगमधून येणारा २५४४ कोटी रुपयांचा महसून घटला. साहजिकच, २०१९-२० च्या तुलनेत रेल्वेचा २०२०-२१ मध्ये घटलेला एकूण महसूल ३४११५ कोटी रुपयांचा राहिला. पण, नियमित गाड्यांच्या तुलनेत कोविड काळात चालविलेल्या या विशेष गाड्यांद्वारे किती वाढीव भाडे वसूल केले आणि त्यातून नेमका किती महसूल कमावला, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

आधी सांगितले जायचे की रेल्वेची खरी कमाई तर मालवाहतुकीतून होते. प्रवासी वाहतूक तर ही सामाजिक जबाबदारी किंवा जनसेवा आहे. पण या सामाजिक जबाबदारीतून मुक्तीच्या दिशेने रेल्वेची वाटचाल सुरू असल्याचे दिसते. रेल्वेने प्रवासभाडे वाढविले नाही, हा डिंडिम वाजविला जात असला तरी वेगवेगळ्या मार्गाने वसूल होणारे शुल्क हे भाडेवाढीचे छुपे रुप आहे. त्यात आरक्षणाच्या माहितीसाठीचे खर्चिक एसएमएस, छापील तिकिटापेक्षा ई तिकिटासाठी अधिक दाम घेणे, क्रेडिटकार्ड किंवा नेट बॅंकिंग या सेवांसाठी अतिरिक्त शुल्क घेतले जाणे, अगदीत वरताण म्हणजे आरक्षित न झालेले ई-तिकीट आपोआप रद्द होत असले तरी त्यावरील आरक्षण शुल्क कापूनच प्रवाशाला परतावा मिळणे, हे त्यातलेच प्रकार आहेत. आता तर कोरोनामुळे स्वस्त प्रवासाची हमी देणाऱ्या पॅसेंजर गाड्या बंद करण्याची संधी साधली गेली आहे. आरक्षणाची आर्थिक क्षमता नसलेल्यांच्या सोईचा जनरल डबाही इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. थोडक्यात, आता साधे तिकीट घेऊन सामान्य माणसाला प्रवास करता येईल अशी स्थिती सध्याच्या काळात नाही.

रेल्वेची कमाई वाढविण्याच्या या प्रकारांसोतच, राष्ट्रीय रोखीकरण धोरणांतर्गत रेल्वे स्थानकांची चलनीकरणासाठी निवड करणे, स्वच्छता, आहार या प्रवाशांशी संबंधित सेवांमध्ये खासगी क्षेत्राचा झालेला शिरकाव यामुळे सरकारच्या हेतूंबाबत घेतला जाणारा वहीम कायम आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहातील किमान डझनभर खासदारांच्या प्रश्नांचा थेट रोख सरकारला रेल्वेचे खासगीकरण होते आहे काय, असे विचारण्याकडे होता. तर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे यामुद्द्यावर राज्यसभेतले उत्तर या सरकारची दिशा आणि नियत उघडपणे दर्शविणारे होते. खासगीकरण ही सापेक्ष संकल्पना आहे, इंजिन रोलिंग स्टाॅक (डबे), रुळ, जमीन, पाणी हे सरकारी आहे, तोपर्यंत रेल्वेचे खासगीकरण झाले असे कसे म्हणता येईल, हा युक्तिवाद रेल्वेमंत्र्यांचा होता.

सरकारी वाहतुकीच्या साधनांचा वापर करताना कल्याणकारी भूमिका खुंटीवर टांगण्याचे धोरण वर्तमान सरकारचेच आहे असे नाही तर युपीएच्या काळातही हाच प्रकार होता. तेव्हाच्या योजना आयोगाच्या रेल्वे विकासाच्या योजना, विमान प्रवासाची क्षमता असलेल्या आणि रेल्वेत पहिल्या, दुसऱ्या श्रेणीचा वातानुकुलीत प्रवास करणाऱ्यांना गृहीत धरून आखलेल्या असायचा. रेल्वेच्या एकूण प्रवासी संख्येमध्ये संपन्न श्रेणीच्या आणि खरेदी क्षमता असलेल्या प्रवाशांचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा अधिक नाही. पण रेल्वेचे ९० टक्के प्रवासी स्वतःचे खाणे सोबत आणणारे, प्लॅटफाॅर्मवरचे पाणी पिणारे आहेत. त्यांना फक्त प्रवास करायचा असतो. तिकीट घेतल्यानंतर जागा मिळावी आणि गंतव्यापर्यंत पोहोचावे एवढीच माफक अपेक्षा त्यांची असते. तेजस या लक्झरी गाड्यांना फारसा प्रतिसाद यामुळेच मिळाला नाही. तेव्हा, चकाकी वाढविण्याऐवजी रेल्वेची क्षमता वाढविणे हा एकमेव पर्याय आहे, ही आॅल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशन या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे सरचिटणीस शिवगोपाल मिश्रा यांची टिप्पणी बोलकी आहे.

मागची दोन वर्षे रेल्वेसाठी चांगली होती. २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये रेल्वेचा एकही अपघात झाला नव्हता. पण, बिकानेर- गोवाहाटी एक्स्प्रेसला पश्चिम बंगालमध्ये झालेल्या अपघातामुळे हा नव्या वर्षाची सुरवात रेल्वेसाठी दुःखद राहिली आहे. सारे काही चांगले असते तेव्हा खासगी क्षेत्राच्या कार्यक्षमतेचे गोडवे गायले जातात. पण संकट येते तेव्हा सरकारी यंत्रणाच उपयोगाला येते, मग ती आरोग्यासाठी असो, सुरक्षेसाठी असो किंवा वाहतकीसाठी असो किमान, येत्या अर्थसंकल्पात रेल्वेबद्दल आणि सर्वसामान्य प्रवाशांबद्दल विचार व्हावा, ही अपेक्षा आहे. यासाठी मधू दंडवते रेल्वेमंत्री असतानाचे उदाहरण पुरेसे ठरावे. रेल्वेच्या स्लिपर क्लासमध्ये लाकडी बाकांवर दोन इंची फोम बसवून आरामदायी प्रवासाची संधी देण्याची देणगी मधू दंडवते यांची आहे

(प्रसिद्धी दिनांक - १७ जानेवारी २०२२) राजधानी दिल्ली

चूक, निष्काळजीपणा की षड्‌यंत्र?

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेतील गोंधळ गंभीर आहे. त्याबाबत जबाबदार असलेल्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे. तथापि, त्याचे राजकारण ज्या पद्धतीने होत आहे, ते खेदजनक आहे.



पं तप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या जीवाला धोका असल्याच्या आणि दहशतवाद्यांचा खातमा झाल्याच्या बातम्या नियमित अंतराने झळकायच्या. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात भाजपची सत्ता असताना पोलिसांनी पंतप्रधानांच्या हत्येचा प्रयत्न असल्याचे सांगत शहरी नक्षलवाद्यांचे षड्‌यंत्र शोधून काढले होते. या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेचा झालेला खेळखंडोबा हा निश्चितच गंभीर आहे. यामागे चूक होती, निष्काळजीपणा होता की खरोखर षड्‌यंत्र होते, याचा शोध घेतलाच पाहिजे.

हुसैनीवाला येथील हुतात्मा स्मारकाला भेट देण्यासाठी पंतप्रधान मोदींचा वाहन ताफा रस्त्याने गेला आणि यादरम्यान पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या सर्व नियमांची ऐशीतैशी झाली. देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीचा वाहनताफा काही आंदोलकांमळे उड्डाणपुलावर अडकतो. शेजारून वर्दळ सुरूच राहते. या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी, पोलिस प्रशासनाशी संपर्कही होत नाही. त्यामुळे हतबल अवस्थेत पंतप्रधानांचा ताफा १५ ते २० मिनिटे अडकून पडतो. हा संपूर्ण घटनाक्रम जेवढा नाट्यमय, तेवढाच सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. हतबल, असहाय्य आणि असुरक्षित अवस्थेत उड्डाणपुलावर अडकून पडलेल्या पंतप्रधान मोदींनी भटिंडा विमानतळावर पोहोचल्यानंतर, “तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा की, मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचलो,’’ यासारखे विधान केल्याचे सुरक्षा दलाच्या सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध होते. त्यावर पंतप्रधान कार्यालयाचे आणि सत्ताधारी भाजपचे मौन धक्कादायकच आहे.

इंग्रजीत म्हण आहे, की ‘लिडर शुड ऑलवेज लीड फ्रॉम फ्रंट’. अग्रभागी राहून नेतृत्व करणाराच खरा नेता असतो. यासंदर्भात यापूर्वीच्या पंतप्रधानांची उदाहरणे उल्लेखनीय आहेत. आणीबाणीच्या काळात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) डाव्या विद्यार्थी संघटनांनी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींना काळे झेंडे दाखवले होते. इंदिराजींनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. त्यांना निवेदन वाचून दाखविताना आताचे माकप नेते सीताराम येचुरी यांचे छायाचित्रही गाजले होते.

असाच प्रकार डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना घडला होता. ‘जेएनयू’मध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाहनाला घेराव घातला होता. डॉ. सिंग यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्याआधीचे उदाहरण म्हणजे, १९७७मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई पुण्यात टिळक स्मारक मंदिरात कार्यक्रमासाठी गेले होते. तेव्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनावर चप्पलफेक केली होती. त्याला फारसे महत्त्व न देता देसाईंनी आपला कार्यक्रम पूर्ण केला. त्यावेळची परिस्थिती आता नाही, हे खरे असले तरी संवादाच्या अभावाचा मुद्दा या निमित्ताने प्रकर्षाने समोर आला, हे नाकारता येणार नाही.

सुरक्षेचे भावनिक भांडवल

पाकिस्तानसाख्या कुरापतखोर देशाशी सीमा असलेल्या, दोन दशकांच्या दहशतवादाचा इतिहास असलेल्या आणि पंजाबसारख्या राज्यामध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेला खिंडार कसे पडते, ‘एसपीजी’ पंतप्रधानांची सुरक्षा हाताळत असताना, त्यांना रस्त्याने नेण्याचा निर्णय कोणाचा, सारे सुरळीत असल्याचे गृहीत धरून पंतप्रधानांना अशा मार्गाने नेणे, जेथे त्यांना धोका उद्भवू शकतो, हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश नाही काय, पंतप्रधानांच्या वाहन ताफ्याजवळ जमाव कसा पोहोचला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत. घटनेस जबाबदारांवर कारवाईही व्हावी. मात्र या घटनाक्रमावरून सुरू झालेले राजकीय आरोप-प्रत्यारोप राजकारणाचा स्तर घसरल्याचे निदर्शक आहे.

काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये मोदींचा सुरक्षेला

धोका उद्भवणे, हा त्यांच्या हत्येचा प्रयत्न आहे. यामागे काँग्रेसचे ‘खुनी इरादे’ असल्याचा आरोप भाजपकडून होणे; तर काही अनुचित घडले नाही ना, यासारखी काँग्रेसची उथळ टिप्पणी पाहता, दोन्ही पक्ष या घटनेकडे किती गांभीर्याने पाहतात, हे दिसते. पंतप्रधानांचा जीव धोक्यात हा भावनिक प्रचाराचा मुद्दा विधानसभा निवडणुकांमध्ये विशेषतः उत्तर प्रदेशात बनविण्याची भाजपची खेळी स्पष्टपणे दिसते.

पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून सहानुभूती मिळविण्याचा आणि त्याचे मतांमध्ये रुपांतर व्हावे यासाठीचा भाजपचा प्रयत्न दिसतो. परंतु, शेतकरी आंदोलनानंतर झुकावे लागल्याने आणि प्रतिष्ठेचा मुद्दा केलेले कृषी कायदे मागे घेतल्यामुळे मोदींच्या कणखर नेतृत्वाच्या प्रतिमेला गेलेला तडा याची सल भाजपमध्ये जाणवते. त्यातच राज्यपालांसारख्या घटनात्मक पदावरच्या सत्यपाल मलिक यांच्या वादग्रस्त विधानाने मोदींच्या प्रतिमेला सुरूंग लावण्याची कोणतीही कसर ठेवलेली नाही. मोदींची शेतकऱ्यांबद्दलची भावना चांगली नव्हती आणि गृहमंत्री अमित शहा मोदींबद्दल वावगे बोलल्याची मलिक यांची विधाने प्रसिद्ध झाल्याने भाजपची कोंडी झाली. अखेर मलिक यांनी खुलासा केला, पंतप्रधान मोदींबद्दल आदर व्यक्त केला आणि अमित शहा काहीही बोलले नसल्याची सारवासारवही केली. मात्र, त्यांच्या शब्दबाणांनी करायचे ते नुकसान केले. त्या धक्क्यातून सावरण्यासाठी आणि आक्रमकपणे समर्थकांपुढे जाण्यासाठी भाजपला जो मुद्दा हवा होता, तो मोदींच्या सुरक्षेबाबत पंजाबमधील घटनेने मिळवून दिला आहे.

दुसरीकडे, नवज्योतसिंग सिद्धूंच्या उपद्‌व्यापांनी त्रस्त असलेल्या काँग्रेसला या घटनेमुुळे पंजाबमध्ये नवा मुद्दा मिळाल्याने हायसे वाटले आहे. भाजपचे आरोप पंजाबचा अपमान करणारे असल्याचे काँग्रेस म्हणू लागली आहे. पण पंतप्रधानांसारख्या घटनात्मक संस्थेच्या सुरक्षेबद्दल सवंगपणा नको, हे भान सत्तेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आणि सुरक्षेतील चुकीमुळे दोन महत्त्वाचे नेते गमावलेल्या काँग्रेसकडून राखले गेलेले नाही. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधींची ‘एसपीजी’ सुरक्षा हटविल्यानंतर थयथयाट करणारे, २०१९ मध्ये राहुल गांधींच्या रोड शो दरम्यान त्यांच्यावर चमकलेल्या मोबाईल टॉर्चच्या प्रकाशाला लेझर गनचा प्रकाश म्हणून सुरक्षेबद्दल सरकारवर आरोप करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे नेते पंतप्रधानांच्या सुरक्षेबद्दल उथळपणे बोलतात आणि उठसूट उदारमतवादाचा दाखला देणारे काँग्रेसचे नेतृत्व त्यांना दटावत नाही किंवा पंतप्रधानांची विचारपूस करण्याचे, किमानपक्षी घटनेबाबत चिंता व्यक्त करणारे ट्विट करण्याचे सौजन्य दाखवत नाही, असेदेखील दिसते. तेव्हा कटुता टोकाला पोहोचली आहे, हे वेगळे सांगायला नको.

मूठभर निदर्शकांमुळे पंतप्रधानांना अडकून पडावे लागल्यानंतर गृह मंत्रालयाने पंजाब सरकारकडून अक्षम्य चूक घडल्याचा ठपका ठेवला. पाठोपाठ पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी यावर पत्रकार परिषद घेऊन राजकीय उत्तर दिले. या प्रकाराच्या चौकशीसाठी पंजाब सरकारने आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने स्वतंत्र समित्याही नेमल्या. आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचाही हस्तक्षेप झाला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील गोंधळाबाबतच्या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारच्या समित्यांना पुढील आदेशापर्यंत चौकशी थांबविण्यास सांगितले आहे. पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्याचे सर्व तपशील, नोंदी सुरक्षित ठेवण्याचे आदेशही केंद्र तसेच राज्याच्या सुरक्षा यंत्रणांना दिले आहेत. मात्र, चौकशी झाल्यानंतर हे प्रकरण शांत होईल, ही शक्यता धुसर आहे. पंतप्रधानांचा जीव धोक्यात येतो ही घटना दोन दिवसानंतर विसरून जाण्यासारखी नाही. त्यावर इतरांना उदाहरण ठरेल अशी कारवाई आवश्यक आहे, हे एका केंद्रीय मंत्र्याचे विधान सूचक आहे. कारण, पंजाबची पुनरावृत्ती इतर राज्यांमध्ये होऊ शकते. पंतप्रधानांना अडवले जात असेल तर इतर केंद्रीय मंत्र्यांनाही अशा प्रकारांना सामोरे जावे लागू शकते. ही त्यामागची चिंताही आहेच!

(पूर्व प्रसिद्धी - १० जानेवारी २०२२ सकाळ) राजधानी दिल्ली 

थकबाकीने पेटणार केंद्र-राज्य संघर्ष

 ‘जीएसटी’ लागू करण्यात आल्यानंतर राज्यांना केंद्राने काही काळासाठी नुकसान भरपाई द्यावी, असे ठरले होते. पण हा कालावधी आणखी वाढविण्याची जोरदार मागणी राज्यांनी केली. या मुद्यासह इतरही अनेक प्रश्‍नांची तड लावावी लागणार आहे.



कोरोनाचा नवा अवतार असलेल्या ओमिक्रॉनचे संकट उभे ठाकले आहे. यामुळे पुन्हा आरोग्य सेवांवर ताण येण्याची, निर्बंधांमुळे अर्थकारणाला, पर्यायाने सर्वसामान्यांना फटका बसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आर्थिक साधनसंपत्तीची ओढाताण पाहता केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये संघर्ष वाढण्याचीही चिन्हे दिसू लागली आहेत. सहकारातून संघराज्यवादाचे सूत्र धाब्यावर बसविण्याचा आणि आर्थिक नाड्या हातात ठेवून नियंत्रित करण्याचा केंद्राचा प्रयत्न राज्यांना अस्वस्थ करणारा आहे. आरोग्य सेवांवरील वाढत्या खर्चामुळे तिजोरीवरचा ताण राज्यांना असह्य झाला आहे. शिवाय, जीएसटीमुळे केंद्रावरील अवलंबित्व वाढल्याची, केंद्राच्या कल्याणकारी योजना राबविताना जादा आर्थिक बोजा झेलावा लागत असल्याची भावनाही राज्यांमध्ये वाढीस लागली आहे. या परिस्थितीत प्रगतीसाठी विकेंद्रीकरण बाजूला ठेवून केंद्रातील वर्तमान मोदी राजवटीने नियंत्रणासाठी केंद्रीकरणाची ताठर भूमिका घेतल्यास नवा संघर्ष उद्भवू शकतो.

नियंत्रणासाठी केंद्रीकरणाचे ठळक उदाहरण म्हणजे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी). राज्यांचे सर्व कर या जीएसटीमध्ये विलीन झाले आणि महसुलासाठी राज्यांना केंद्रावर अवलंबित्व आले. यामध्ये राज्यांच्या आर्थिक नाड्या आवळून त्यांना आपल्या तालावर नाचण्यासाठी भाग पाडण्याचा हा सरळसरळ खेळ आहे. २०१७ मध्ये लागू झालेल्या जीएसटीमुळे राज्यांची होणारी महसूल हानी भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना पाच वर्षांपर्यंत आर्थिक भरपाई देण्याचे कबुल केले होते. ही पाच वर्षांची मुदत येत्या जूनमध्ये संपुष्टात येत आहे आणि आधीच कोरोना संकटामुळे आर्थिक तोंडमिळवणी साधताना राज्ये आता अक्षरशः रडकुंडीला आली आहेत. म्हणूनच तर, केंद्राने जीएसटी भरपाईचा कालावधी वाढून द्यावा, या मागणीसाठी राज्ये आता आक्रमक झाली आहेत. त्याचे तीव्र पडसाद मागच्या आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांसोबत घेतलेल्या बैठकीत उमटले. मुळात, स्वतःची आर्थिक तरतूद आपल्या अर्थसंकल्पात करण्याची राज्यांना मोकळीक आहे. तरीही केंद्रीय अर्थसंकल्पाच्या बैठकीत जीएसटी भरपाईचा काळ पुढच्या पाच वर्षांसाठी वाढविण्याची मागणी करावी लागणे, याचाच दुसरा अर्थ स्पष्ट आहे, की राज्यांना केंद्राकडून वेळेवर पैसा मिळालेला नाही. कोरोना काळात तर नाहीच नाही.

कोरोनाचे थैमान असल्यामुळे मागच्या वर्षभरात आर्थिक व्यवहार तर ठप्पच राहिले होते. या संपूर्ण वर्षभरात म्हणजे २०२०-२१ मध्ये राज्यांना केंद्राकडून पूर्ण रक्कम मिळाली नाही. अर्थ मंत्रालयाचीच याबाबतची आकडेवारी पाहिली तर, केंद्राकडे राज्यांची नुकसान भरपाईची थकबाकी ३७,१३४ कोटी रुपयांची होती. येत्या काही आठवड्यात संपणाऱ्या २०२१-२२ या आर्थिक वर्षात सप्टेंबरपर्यंतची थकबाकी १४,६६४ कोटी रुपयांची आहे.

आता ही थकबाकी म्हणजे उत्तरार्ध आहे. यातला पूर्वार्ध म्हणजे कोरोना काळात राज्यांनी प्रचंड आरडाओरडा केल्यानंतर केंद्राने अखेर कर्ज काढून राज्यांना भरपाई दिली. खरे तर केंद्र सरकारने राज्यांना खुल्या बाजारातून कर्ज काढा आणि आपली गरज भागवा, असा शाहजोगपणाचा सल्ला दिला होता. टाळेबंदीसारख्या उपायांमुळे घटलेली जीएसटी वसुली आणि राज्यांना भरपाई देण्यासाठी आकारलेल्या उपकरामध्येही पुरेसा निधी न येणे, ही कारणे देत केंद्राने हात वर केले होते. जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये यावर चांगलीच खडाजंगी झाली. अखेर केंद्राला नमते घ्यावे लागले आणि राज्यांना अंशतः भरपाई मिळाली. तरीही राज्यांच्या चिंतेचे निराकरण झालेले नाही. राज्यांची केंद्राकडे तब्बल ५१,७९८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यातही सर्वाधिक म्हणजे तब्बल १३,१५३ कोटी रुपयांची थकबाकी एकट्या महाराष्ट्राची आहे. तमिळनाडूची ४,९४३ कोटी, दिल्लीची ४,६४७ कोटी आणि उत्तर प्रदेशची थकबाकी ५,४४१ कोटी रुपये आहे. या यादीमध्ये इतरही राज्ये आहेतच. थकबाकीची आकडेवारी सप्टेंबरपर्यंतची आहेत. आतापर्यंत त्यात आणखी वाढ झालेली असू शकते.

या हक्काच्या निधीला विलंब होत असताना ओमिक्रॉनच्या वाढत्या उपद्रवामुळे लागू करावे लागणारे कठोर निर्बंध राज्यांच्या पोटात गोळा आणणारे आहेत. कोरोना विषाणूत बदल होऊन तयार झालेल्या ओमिक्रॉनचा नेमका अंदाज आलेला नाही. देशभरात आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे दावे केले जात असले तरी निती आयोगाने आरोग्य सेवांमधील प्रगतीच्या आधारे केलेले मूल्यमापन पाहता राज्यांमध्ये अजुनही बऱ्याच सुधारणांची गरज आहे.

उत्तरेची सुमार कामगिरी

निती आयोगाने २०१९-२० या वर्षभरात आरोग्य क्षेत्रातील कामगिरीच्या आधारे राज्यांचा लेखाजोखा मांडला. कोरोना पूर्वीच्या या काळात आरोग्य क्षेत्रामध्ये दक्षिणेतील राज्यांची स्थिती उत्तम, तर उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांची कामगिरी किती सुमार आहे हे दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या कर्तृत्वावर अथकपणे स्तुतीसुमने उधळताहेत, त्या उत्तर प्रदेशला सुमार कामगिरीसाठी निती आयोगाच्या अहवालात शेवटून पहिला क्रमांक मिळालाय. केरळ, तमिळनाडू, तेलंगणा ही दक्षिणेतील राज्ये अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या आणि महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर राहिला. उत्तर प्रदेशच्या आरोग्य सेवेमध्ये त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे यात नमूद आहे. निती आयोगाचा अहवाल कोरोनापूर्व काळाची स्थिती दर्शविणारा आहे हे मान्य. परंतु, कोरोनाच्या लाटेमध्ये आम्हीच सर्वोत्तम असल्याचे दावेही झाले आणि मृतांचे आकडे काही राज्यांनी लपविल्याचे आरोपही झाले. खरे तर, कोणत्या राज्यांत किती जणांचे जीव वाचवले या आधारावरच आरोग्य सेवांची प्रगती पाहिली जावी. परंतु, कोरोनापूर्व काळात एकूणच आरोग्य सेवेचा पाया भुसभुशीत राहिल्याने कोरोनाच्या लाटेमध्ये डोलारा न कोसळता तरच नवल होते. पण जीएसटी भरपाईचा निधी न मिळाल्याने राज्यांच्या आरोग्य सेवेला चांगलीच झळ बसल्याचे सरळसरळ दिसते. विरोधी पक्षांची सत्ता असलेली राज्ये किमान बोलू शकतात, भाजपशासीत राज्यांना तर तोंड दाबून बुक्क्यांचा मारच आहे.

आधीच कोरोनाच्या धक्क्यातून अर्थव्यवस्था पूर्णतः सावरलेली नाही. अल्प आणि मध्यम उत्पन्न गटाची घटलेली क्रयशक्ती, कारखान्यांनी मर्यादीत क्षमतेने उत्पादनावर दिलेला भर या गोष्टी बेरोजगारी वाढविणाऱ्या आहेत. पुन्हा आर्थिक व्यवहार बंद झाले तर निधी येणार कुठून, तिजोरी भरणार कुठून हे प्रश्न आहेत. म्हणूनच जीएसटी भरपाई देण्याचा कालावधी २०२७ पर्यंत वाढविण्याची मागणी पुढे आली. एवढेच नव्हे तर, आता केंद्रपुरस्कृत योजनांचा आर्थिक भार आपण अंगावर का घ्यावा, ही भावनाही राज्यांमध्ये वाढली आहे. केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यासाठी केंद्राकडून याआधी ९० टक्क्यांपर्यंत अर्थसहाय्य दिले जायचे. ते आता साठ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. म्हणजेच राज्यांना अधिक पैसा केंद्राच्या योजनांसाठी द्यावा लागतो आहे. यामागे आर्थिकदृष्ट्या परावलंबी होण्याची राज्यांची सार्थ भीती आहे. साहजिकच तमिळनाडू, केरळ, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, राजस्थान यांसारख्या राज्यांनी अर्थमंत्र्यांसमोर या मुद्द्याला तोंड फोडले होते. त्यामुळे नव्या अर्थसंकल्पामध्ये केंद्राने अधिक आर्थिक जबाबदारी उचलावी, जीएसटी कायद्यात दुरुस्ती करून भरपाईचा काळ वाढवावा यासाठीच्या मागणीवर मोदी सरकार कितपत लवचिक भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

(पूर्व प्रसिद्धी - ३ जानेवारी २०२२, दै. सकाळ) राजधानी दिल्ली