कोणतीही धाडसी मोहीम राबविण्यासाठी अचूक माहिती, परिपूर्ण योजना आणि व्यक्तीगत सुख-दुःख बाजूला ठेऊन काम करणारे कणखर नेतृत्व हवे असते. या तीन्ही गोष्टी जुळून आल्याने अमेरिकेच्या फारशा चर्चेत नसलेल्या नॅशनल काउंटर टेररीझम सेंटरने (एनसीटीसी) कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला ठार मारण्याची मोहिम यशस्वीरित्या पार पाडली. अबोटाबाद येथे लादेन असल्याची आठ महिन्यांपूर्वी मिळालेल्या पुसटशा माहितीनंतर चिकाटीने केलेला पाठलाग, माहितीची निश्चिती झाल्यानंतर लादेनच्या घराची प्रतिकृती तयार करून केलेली रंगीत तालीम आणि शनिवारी लग्न होऊनही रविवारी, 1 मेस "ऑपरेशन लादेन' पार पाडण्यासाठी मधुचंद्र पुढे ढकलणारा "एनसीटीसी'चा प्रमुख मायकेल लिटर या तीन घटकांच्या आधारे अमेरिकेने इतिहास घडविला. आजपर्यंत फारशा चर्चेत नसलेल्या "एनसीटीसी'ने गुप्त आणि वेगवान हालचाली करून "सीआयए'लाही तोंडात बोटे घालायला लावली.
लादनेला ठार करण्याचे "एनसीटीसी'चे यश हे अमेरिकेतल्या गुप्तहेर यंत्रणांना सुखावणारे आहे. कारण "9/11"च्या दहशतवादी हल्ल्यामुळे गुप्तहेर यंत्रणांना सपशेल अपयशी ठरल्याची टीका सातत्याने झेलावी लागत होती. त्या हल्ल्यामुळे सर्व गुप्तहेर संघटनांमधला समन्वयाचा अभावा उघड झाल्याने तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी इस्लामी दहशतवादाच्या विरोधात कारवाई करू शकणारी विशेष संस्था स्थापन करण्याचा निर्णय केला आणि 2004 मध्ये "राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्र (एनसीटीसी) सुरू स्थापन करण्यात आले होते. या विशेष अधिकारांच्या जोरावरच "एनसीटीसी'ने ही मोहीम अतिशय सुरळीत आणि अहंकाराच्या अडथळ्याविना पार पडली.
ओसामा बीन लादेन इस्लामाबादच्या आसपास, अबोटाबाद येथे भलीमोठी संरक्षक भिंत असलेल्या बंदिस्त घरात राहतो आहे, अशी कुणकूण अमेरिकेला आठ महिन्यांपुर्वीच लागली होती. त्यामुळे या "संभाव्य लक्ष्या'वर अवकाशातून उपग्रहाद्वारे नजर ठेवण्यात आली होती, त्याद्वारे येणाऱ्या- जाणाऱ्या प्रत्येकची नोंद विश्लेषक मंडळी घेत होती. त्यानंतर लादेनच्या अस्तित्वाची पुष्टी करणासाठी कुरीयरचा मार्ग अवलंबण्यात आला. या कुरीयरवर गुप्तहेर यंत्रणांचे बारकाईने लक्ष होते. दर तासाला कुरीयरचा प्रवास कुठल्या टप्प्यात आहे, त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जात होता. तरीही अंतिम कारवाईला लागणारा कालावधी पाहता ऐनवेळी संधी हातातून जायला नको म्हणून हल्ला करणारी "ड्रोन' विमाने देखील तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. येणारी सर्व माहिती अमेरिकी हवाई दळाच्या व्हर्जिनियातील तळावरील "नॉन्डस्क्रिप्ट हॅंगर' या केंद्रावर डाऊनलोड केली जात होती. विश्लेषकांचे पथक पुढ्यात आलेल्या माहितीचे विश्लेषण करून सीआयए, राष्ट्रीय सुरक्षा संस्था (नॅशनल सिक्युरिटी एजन्सी) आणि एनसीटीसीकडे पुढील कारवाईसाठी पाठवित होते. वाशिंग्टनजवळ पोटोमॅक नदीच्या काठावरील रोझलीन भागामध्ये साधारणशा व दुर्लक्षित इमारतीमध्ये कार्यालय थाटलेल्या "एनसीटीसी'ची समांतर कारवाई सुरू झाली होती. लष्कराच्या लक्ष्यनिश्चिती आणि विशेष कृतीसाठी उपयुक्त "जॉईन्ट स्पेशल ऑपरेशन कमांड टार्गेटींग ऍन्ड ऍनालिसीस सेंटर- एसओसी' तसेच अपेक्षित भूभागाचे बारकाईने विश्लेषण शकणाऱ्या "नॅशनल जिओस्पॅटिअल - इंटेलिजन्स एजन्सी'च्या मदतीने "एनसीटीसी'ने लादेनच्या घराचे एवढेच नव्हे तर त्यात राहणारे व्यक्ती, त्यांची राहण्याची कामाची पद्धत याचे अचूक चित्र तयार केले. त्यानंतर खऱ्या अर्थाने पुढील कारवाई सुरू झाली. अफगाणिस्तानातल्या बगराम येथे असलेल्या अमेरिकेच्या हवाई दळाच्या केंद्रावर "एनसीटीसी'ने तयार केलेल्या या चित्राच्या आधारे लादेनच्या घराची हुबेहूब प्रतिकृती बनविण्यात आली. त्यासाठी हेच ठिकाण निवडण्याचे कारण म्हणजे अंतिम हल्ल्यासाठी उपयुक्त असलेले बगरामचे इस्लामाबादपासून अवघ्या तासाभराचे अंतर. या "नव्या घरात' हल्ल्याची आणि विशेषतः कमीत कमी वेळेत मोहीम पार पाडण्याची रंगीत तालीम घेण्यात आली. त्यानंतर रविवारी जे काही झाले ते राष्ट्र म्हणून अमेरिकेला अभिमान वाटावे असेच ठरले. "एनसीटीसी'ची माहिती इतकी अचूक होती की हल्ला करणारे कमांडो त्या जागेची खडान्खडा माहिती असल्यासारखे तेथे वावरले.
लादेनला हात लावल्यास त्याचे जगभर पडसाद उमटतील, अशी भीती व्यक्त केली जात होती. परंतु, असे काहीही होणार नसल्याबद्दल "एनसीटीसी' निःशंक होती. एक तर तब्बल दहा वर्षानंतर ही कारवाई झाली. तोपर्यंत मधल्या काळात "अल कायदा'पासून प्रेरणा घेतलेल्या इस्लामिक दहशतवाद्यांनी येमेन, सोमालिया अशा ठिकाणी आपापली स्वतंत्र संस्थाने उघडली. यामुळे घातपात करणारे गट दुरावल्याने लादेन एकटा पडला होता. "अल कायदा'ची शक्तीही क्षीण झाली होती. 2009 च्या एका लहान हल्ल्यात 13 जण ठार झाले होते. केवळ याच हल्ल्यामागे "अल कायदा'चा हात होता. तर नंतरच्या तीन (त्यातले दोन विफल करण्यात आले) हल्ल्यांमागे "अल कायदा'ची अपत्य संघटना चालविणारा येमेनचा अन्वर-अल-अवालकी हा होता. अवालिकीची संघटना आणि इतर दहशतवादी संघटनांनी घातपाती कृत्यांची योजना आणि अंमलबजावणी यात चांगलेच कौशल्य संपादन केले. चक्क अमेरिकेतूनच इस्लामी दहशतवादी तयार करण्याचे तंत्र त्यांनी अवलंबले होते. पूर्वाश्रमीचा कार्लोस ब्लेडोस या 24 वर्षाचा तरूणाला अब्दुलहकीम मुजाहीद मुहम्मद बनविण्यात त्यांना यशही आले. या कामगिरीमुळे पाकिस्तानातील मूळ "अल कायदा'ला या संघटनांनी कधीच मागे टाकले. शिवाय, कोणत्याही प्रकारे "मूळ अल कायदा'वर अवलंबून राहण्याची गरज नसल्याने या संघटना स्वतंत्र आणि पूर्णतः स्वायत्त म्हणून उदयास आल्या. साहजिकच या प्रकारामुळे दहशतवाद्यांचा मानबिंदू असलेल्या ओसामा बीन लादेनची लोकप्रियता पूर्ण ओसरल्याचे "एनसीटीसी'चे विश्लेषणही अचूक ठरले.
---------------------
नौदलाच्या "ईए 6 बी' जातीच्या लढाऊ विमानांनी पायलट राहिलेला बाल्कन तसेच इराकच्या युद्धात थेट सहभागी झालेला मायकल लिटर याच्याकडे "एनसीटीसी'चे प्रमुख पद सोपविण्यात आले. हा निर्णय होता तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांचा. हॉर्वर्ड लॉ स्कूलचा विद्यार्थी राहिलेला लिटर, हे पद स्विकारण्यापूर्वी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश स्टिफन जी ब्रेयर यांच्यासोबत काम करत होता. बुश यांची राजवट संपल्यानंतर त्यांनी "एनसीटीसी'चे प्रमुखपद लिटरकडेच राहू द्यावे, यासाठी स्वतः बराक ओबामांना गळ घातली होती. 42 वर्षीय मायकेल लिटर 30 एप्रिलला, शनिवारी विवाह बंधनात अडकला होता. रविवारी मधुचंद्र होता. लग्नानंतर मधुचंद्र साजरा करण्यासाठी जबाबदारी पुढे ढकलणारे अनेक जण आहेत. पण, जबाबदारीसाठी मधुचंद्र पुढे ढकलणाऱ्या मायकेलचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे.