गुरुवार, ८ ऑक्टोबर, २००९

'लालां'च्या हरियानात कॉंग्रेसला पुन्हा गुलाल?

भारतीय राजकारणाला आयाराम-गयारामच्या घाऊक व्यवहाराची ओळख करून देणाऱ्या हरियानातील हा किस्सा. ८० च्या दशकात हरियाना विधानसभेत दोन "लाल' नेते चुरशीने लढत होते. एकाची लढाई सत्ता सांभाळण्यासाठी, तर दुसऱ्याचे प्रयत्न पहिल्याला खुर्चीवरून खाली उतरवण्यासाठी होते. आमदारांच्या फोडाफोडीचे प्रयत्न दोन्ही बाजूंकडून सुरू होते. साहजिकच, दोघांचे आपल्या गटातील आमदारांवर बारीक लक्ष होते. एका नेत्याने तर आमदार सांभाळण्यासाठी लाठीधारी पैलवानच नेमले होते. एक आमदार मध्यरात्री इमारतीच्या ड्रेनेज पाईपला धरून उतरला. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पैलवानांनी त्याला पकडून नेत्यासमोर नेले. "कुठे जात होतास', असे दरडावून विचारल्यानंतर हा आमदार उत्तरला, "ताऊ, मी तर तुमच्या कळपातील गाय, जाणार कुठे? थोडे तिकडे चरतो. परत यायचेच आहे!'
अख्खे मंत्रिमंडळच पक्षांतर करू शकते, याचे उदाहरण ठेवणाऱ्या या हरियानाची विधानसभा निवडणूक हिंदी पट्ट्यात लक्ष वेधून घेत आहे. विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. २००५ च्या निवडणुकीत कॉंग्रेसने त्यापैकी ६७ जागा सहज खिशात घातल्या होत्या, तर दोन आकडी संख्या केवळ अपक्ष आमदारच पार करू शकले होते. प्रस्थापित पक्षांचा "सुपडा साफ' झाला होता. राष्ट्रीय पक्ष म्हणवणाऱ्या भाजपला दोन, ओमप्रकाश चौताला यांच्या भारतीय राष्ट्रीय लोकदल पक्षाला ९, तर मायावतींचा बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. ही बहुमताची मजबुती आणि मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांचे नेतृत्व या मदतीने कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीत राज्यातील १० पैकी ९ जागा सहज मिळवल्या. या कामगिरीच्या जोरावरच मुदत पूर्ण होण्याआधी विधानसभेची निवडणूक घेण्यास कॉंग्रेस पक्ष धजावला आहे.

लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीतील मुद्दे एकसारखे नसतात. त्यामुळे निकाल वेगवेगळेही लागू शकतात, असे विरोधकांचे म्हणणे आहे. कॉंग्रेस नेते मात्र आपल्याला "हॅटट्रिक'ची संधी असल्याचे म्हणत आहेत. "पाच वर्षात पाणी पुलाखालून गेले आहे आणि विरोधकांसाठी एवढीही प्रतिकूल परिस्थिती नाही. तरीही आम्हाला फरक पडणार नाही', असे कॉंग्रेसचे नेते म्हणत आहेत. गेल्या वेळेइतक्‍या बहुमताची पुनरावृत्ती होईलच, याची खात्री नसली, तरी सत्ता राहील याबाबत "चोवीस, अकबर मार्ग' या कॉंग्रेस मुख्यालयात मात्र निश्‍चिंतता आहे. थोडी संख्या इकडे तिकडे झाली, तर "मॅनेज' करता येईल हा आत्मविश्‍वासही नेतेमंडळी खासगीत बोलून दाखवत आहेत. वर उल्लेख केलेला किस्साही एका कॉंग्रेसच्या नेत्यानेच सांगितला. त्यामुळे या निवांतपणाचे कारण कशात आहे ते कळते.

हरिभूमीत लाल नेते

हरियानातील समाजजीवन जाट बाहुल्याचे. राजकारणावर वर्चस्वही याच समाजाचे. प्रश्‍न आहे तो नेतृत्वाचा. जाटांचे नेतृत्व कोणी करायचे, याचा. देवीलाल, बन्सीलाल ही नावे होती, अन्‌ भजनलाल हे जाटेतरांचे नेते. आता राज्यशकट यशस्वीपणे हाकणारे हुडा हे जाट नेते बनले आहेत. त्यांना त्यांच्याच मंत्रिमडळातील अर्थमंत्री चौधरी वीरेंद्रसिंह यांनी आव्हान दिले आहे. वीरेंद्रसिंह उचाना कलान मतदारसंघातून लढत असून, त्यांना ओमप्रकाश चौताला यांचा सामना करावा लागणार आहे.

दुसरीकडे पुन्हा एकदा जुन्या "लाल' नेत्यांची नावे ऐकू येऊ लागली आहेत. अर्थातच त्यांच्या वारसदारांच्या रूपात. देवीलालपुत्र ओमप्रकाश चौताला यांचे दोन पुत्र त्यांच्याच पक्षातर्फे रिंगणात आहेत, तर एक अपक्ष निवडणूक लढवत आहे. माजी संरक्षणमंत्री बन्सीलाल यांच्या कुटुंबातील तिघे कॉंग्रेसतर्फे मते मागणार आहेत. यातील महत्त्वाचे नाव म्हणजे बन्सीलाल यांच्या स्नुषा आणि पर्यटन-वनमंत्री किरण चौधरी. जाटेतरांचे नेते भजनलाल हे खासदार आहेत. पण त्यांच्या पत्नी जस्मा देवी आणि मुलगा कुलदीप बिश्‍नोई हे देखील मतदारांना साद घालणार आहेत. त्यामुळे ही "लाल' कुटुंबे आपला करिश्‍मा कसा राखतात, हे या निवडणुकीतून दिसणार आहे.

राजकारणात एखाद्या समुदायाचे वर्चस्व वाढायला लागले, की इतर समुदाय त्याविरोधात एकवटतात. हरियानातही तसाच प्रकार आहे. जाट विरुद्ध जाटेतर. जाटेतरांचे नेते म्हणविले जाणारे भजनलाल "हरियाना जनहित कॉंग्रेस'च्या माध्यमातून हा असंतोष एकवटण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजपला तसा येथे फारसा थारा नाही. पण, विरोधातील मते एकत्र आणण्यासाठी भजनलाल यांची भाजपशी अनौपचारिक बोलणी सुरू होती. ती फिसकटली. दलितांचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे मायावतींशीही आघाडीची बोलणी चालविली होती. पण, तीही अयशस्वी ठरली. दोन जागा मिळविणारा भाजप यंदा सर्व ९० जागा लढवत आहे. निवडणूक जिंकण्याचा नव्हे, तर सर्व मतदारसंघांमध्ये आपले चिन्ह पोचवण्याचा आणि संघटनात्मक ताकद वाढविण्याचा या पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळे कॉंग्रेस विरुद्ध विखुरलेले विरोधी पक्ष असा सामना आहे. कॉंग्रेसने चोवीस तास वीज, वृद्धांना १२०० रुपये निवृत्तीवेतन, गव्हाचा दर प्रतिक्विंटल १४०० रुपये असा आश्‍वासनांचा पाऊस पडला आहे. यामागे हुडा यांचे कौशल्य असून, त्याची छाप त्यांनी उमेदवार यादीवरही ठेवली आहे. देशभरात गाजलेल्या चांद-फिजा प्रकरणातील माजी उपमुख्यमंत्री चंद्रमोहन उर्फ चांद यांना उमेदवार यादीतून अलगद बाजूला सारण्यात त्यांचाच हात आहे.

थोडक्‍यात, कॉंग्रेस पुन्हा सत्ताप्राप्तीसाठी, भाजप संघटनात्मक शक्‍ती वाढविण्यासाठी, तर लाल घराण्यांचे वारसदार आपल्या वाडवडिलांचा करिश्‍मा पुन्हा एकदा आजमावून पाहण्यासाठी लढत आहेत. पण, महागाईचे आव्हान आहेच. त्रासलेले मतदार काय करू शकतात याचा अनुभव कॉंग्रेसने दिल्लीच्या पोटनिवडणुकीत घेतला आहे. इथे काय होते ते बघू या....

(पूर्व प्रसिद्धी ः दैनिक सकाळ, ता. ५ आॅक्टोबर २००९)